आशपाक पठाण , लातूरपाणी, स्वच्छता आणि आरोग्यविषयक कामाला प्राधान्य देत लातूर जिल्ह्यात स्वच्छतेची चळवळ गतीमान करण्यावर आपला विशेष भर राहणार आहे़ याशिवाय जलयुक्त शिवार, जलपुनर्भरण, गॅबियन बंधारे, भुमीगत बंधाऱ्यांच्या कामातून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न राहील, असे जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ माणिक गुरसाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़लातूरची जिल्हा परिषद राज्यात नावाजलेली आहे़ ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावले पाहिजे, यासाठी स्वच्छतेच्या कामावर विशेष लक्ष देणार आहे़ गावची जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत परिसर स्वच्छ राहील, यातून लोकांना प्रेरणा देत वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येईल़ घरात शौचालय बांधून प्रमाणपत्र घेणाऱ्यांची संख्या अधिक असते़ त्याचा वापर होत नसेल तर त्या कुटुंबाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, उघड्यावर जाणाऱ्या महिलांची होणारी कुचंबना थांबविण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जाईल़जलपुनर्भरणाच्या कामांना गती देणे, जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्ता वाढीवर लक्ष दिले जाणार आहे़ राखीपौर्णिमेनिमित्त बहिणीला संरक्षणाचे आश्वासन देणाऱ्या भावाने उघड्यावर जाणाऱ्या आपल्या माता भगिनींना यंदाच्या पौर्णिमेला शौचालयाचे बांधकाम करून देत आरोग्याची ओवाळणी द्यावी, असे आवाहन सीईओ गुरसाळ यांनी केले़ कामचुकार कर्मचाऱ्यांवर विशेष लक्ष देत सामान्य माणसांच्या समस्या सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले़ मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील डाऊच खुर्द (ता़ कोपरगाव) येथील रहिवासी असलेले डॉ़ माणिक गुरसाळ हे १९९४ साली शासकीय सेवेत दाखल झाले़ उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, विभागीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे़ धुळे, नाशिकच्या विभागीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना तीन महिन्यात गुरसाळ यांनी २४ हजार प्रकरणे निकाली काढली़ धुळे, जळगाव जिल्ह्यात असताना टंचाईत पाणीपुरवठ्याचे मोठी कामगिरी केली़
स्वच्छतेची चळवळ गतीमान करणार
By admin | Published: August 19, 2016 12:46 AM