छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य रस्ते अत्याधुनिक वाहनांद्वारे स्वच्छ करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तब्बल २ कोटी ३७ लाख रुपये खर्च करून ७ वाहने खरेदी केली. वाहनांचे डिझाइन योग्य नसल्याचा निर्वाळा देत आरटीओ कार्यालयाने ‘पासिंग’साठी नकार दिला. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून ही वाहने एकाच ठिकाणी उभी आहेत. विशेष बाब म्हणजे, १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते याच वाहनांचे लोकार्पणही महापालिकेने केले.
मनपा प्रशासक जी. श्रीकांत शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. इंदौरपेक्षाही आपले शहर अधिक स्वच्छ दिसावे, यासाठी यांत्रिकी विभागाने लुधियाना येथील मे. हर इंटरनॅशनल कंपनीकडून ७ स्वीपिंग मशीनची खरेदी केली. कंपनीने नियोजित वेळेत मनपाला वाहने देताच प्रशासनाने पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी एकूण २० वाहनांचे लोकार्पण केले. जवळपास ४ कोटींची ही वाहने होती. यात ७ स्वीपिंग मशीन, ३ जेटिंग मशीन, ३ टँकर, २ डॉग व्हॅन, २ बिफ व्हॅन, १ व्हॅक्सिन व्हॅन, दोन रोडरोलरचा समावेश होता. यातील ७ स्वीपिंग मशीन पासिंगसाठी आरटीओ कार्यालयात नेल्या. वाहनांचे डिझाइन बदलल्याने अधिकाऱ्यांनी पासिंगसाठी नकार दिला. सध्या ही वाहने मनपाच्या पेट्रोल पंपावर धूळखात उभी आहेत. आता त्याचे टायर खराब होत आहेत.
पासिंग करून देणे कंपनीचे काममहापालिकेने लोकार्पण केल्यानंतर वाहने पासिंगसाठी नेली. त्यातील स्वीपिंगची वाहने काही तांत्रिक कारणांमुळे थांबविली. कंपनीने अशाच डिझाइनची वाहने अन्य राज्यांतही दिली आहेत. त्याचे फिटनेस प्रमाणपत्र आरटीओला दिले. आता आरटीओच्या सांगण्यानुसार कंपनीला डिझाइनमध्ये बदल करून द्यावा लागेल.-अमोल कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, मनपा