औरंगाबाद : खाम नदीच्या पात्रात १०० फुटांच्या आत येणाऱ्या अतिक्रमणांवर बुधवारी कारवाई करण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने तब्बल ५५ लहान-मोठी घरे जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे नदीपात्रात एकच हाहाकार उडाला आहे. नदीच्या पात्रात प्लॉटिंग करून गोरगरीब नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भूमाफियांवरही मनपाने फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरातील जमिनींचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. औरंगाबाद शहरात आपलेही एक हक्काचे घर असावे, असे प्रत्येक गरीब नागरिकाचे स्वप्न असते. मागील २० वर्षांमध्ये भूमाफियांनी खाम नदीचे पात्र गिळण्याचे काम केले आहे. गरीब नागरिकांना ५० ते ६० हजार रुपयांमध्ये भूमाफियांनी प्लॉट विकले आहेत. बाँड पेपरवर झालेला हा व्यवहार कायदेशीर नसला तरी गरिबांसाठी तोच कागद मोठा ‘आधार’असतो. नदीच्या पात्रात पाच हजारांहून अधिक नागरिकांनी माती आणि विटांनी आपला ‘आशियाना’बांधला. यामध्ये पक्की घरेही बरीच आहेत. नदी पात्रात ३०० ते ४०० मीटरपर्यंत दाट लोकवस्ती झाली आहे. मागील दहा वर्षांपासून पावसाळ्यात खाम नदीच्या पात्राचा विषय गाजत असतो.
खाम पात्राची ‘सफाई’ सुरू
By admin | Published: May 12, 2016 12:10 AM