औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयातील लिक्विड ऑक्सिजन टँकजवळ आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळेचा कंटेनर ठेवण्यात आल्याने ‘पेसो’ प्रमाणपत्र मिळत नाही. हा प्रकार ‘लोकमत’ने समोर आणताच ही प्रयोगाशाळा टँकजवळून हटविण्यात आली आहे. त्यामुळे ‘पेसो’ प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा रुग्णालयात तब्बल ५ महिन्यांनंतरही लिक्विड ऑक्सिजन टँक कार्यान्वित झालेला नाही. ‘पेट्रोलियम ॲण्ड एक्स्प्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन’च्या (पेसो) प्रमाणपत्राची प्रतीक्षा केली जात आहे. याविषयी ‘लोकमत’ने २५ ऑगस्ट रोजी ‘लिक्विड ऑक्सिजन टँक ५ महिन्यांपासून रिकामाच’ हे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळेचा कंटेनर हलविण्यासंदर्भात सूचना केली. प्रयोगशाळेचा कंटेनर आता रुग्णालयाबाहेरील जागेत ठेवण्यात आला आहे. लवकरच ‘पेसो’ प्रमाणपत्र मिळेल, असे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रदीप मुरंबीकर म्हणाले.
-----
फाेटो ओळ..
लिक्विड ऑक्सिजन टँकजवळील प्रयोगशाळा आता जिल्हा रुग्णालयाबाहेर हलविण्यात आली आहे.