छत्रपती संभाजीनगर : महापालिका प्रशासनाने मागील वर्षी प्रत्येक माजी नगरसेवकाला १ कोटी रुपये विकासकामांसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात वर्षभरात ११५ कोटींपैकी २५ कोटी रुपयांचीही कामे झाली नाहीत. प्रलंबित विकासकामे यंदाच्या अर्थसंकल्पात स्पील म्हणून पुढे ढकलण्यात आली. या कामांच्या फायलींवर प्रचंड धूळ साचली होती. झाेन क्रमांक १ मधील तब्बल दीडशेहून अधिक फायलींचा निपटारा शहर अभियंता कार्यालयामार्फत करण्यात आला.
महापालिकेचे उत्पन्न कमी आणि विकासकामांची मोठ्या प्रमाणात दरवर्षी तरतूद केली जाते. त्यामुळे अनेक कामे प्रलंबित असतात. ही कामे अत्यावश्यक असतानादेखील फायली धूळखात पडून राहतात. अंदाजपत्रक तयार करणे, अंदाजपत्रकाला मंजुरी घेणे, निविदा प्रक्रिया, निविदा मंजुरी, एजन्सी निश्चित करणे, त्यानंतर कार्यारंभ आदेश अशी फायलींची लांबलचक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत काही फायली विविध विभागात तशाच पडून राहतात. आर्थिक वर्ष संपल्यानंतरही या फायलींना कोणी हात लावत नाही. त्यात अत्यावश्यक कामाच्या अनेक फायली अडकून पडल्या होत्या. यासंदर्भात शहर अभियंता ए. बी. देशमुख यांनी सांगितले की, गतवर्षीच्या स्पीलच्या कामाचा आकडा तब्बल २९३ कोटी ५० लाखांवर गेला. त्यामुळे अत्यावश्यक कामाच्या फायली तातडीने निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रभाग १ मधील सुमारे दीडशे संचिका निकाली काढण्यात आल्या आहेत.