सिल्लोड: जमिनीच्या हद्दखुणाकरून मोजणी नक्कल तक्रारदाराला उपलब्ध करून देण्यासाठी ९ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना सिल्लोड येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील लिपिकास एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास कार्यालयासमोर करण्यात आली. चंद्रशेखर राजाभाऊ अन्वीकर ( रा.अनवी ता सिल्लोड) असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे.
उपअधीक्षकभूमी अभिलेख कार्यालय सिल्लोड येथील दुरुस्ती लिपिक व अतिरिक्त पदभार भूमापक चंद्रशेखर अन्वीकर याने तक्रारदाराकडे जमिनीची नक्कल देण्यासाठी २५ हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी ५ हजार रुपये आधी स्विकारले होते. उर्वरित १० हजार रुपये आज देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी करून आज सकाळी भूमी अभिलेख कार्यालयासमोर सापळा लावला. सकाळी गेटवर चहाच्या टपरीजवळ तक्रारदार यांच्याकडून ९ हजार ५०० रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने चंद्रशेखर अन्वीकरला रंगेहाथ पकडले.
ही कारवाई ला.प्र.वि.औरंगाबाद विभागाचे पोलीस अधीक्षक, संदिप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उप अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, कर्मचारी अशोक नागरगोजे, रविंद्र काळे चंद्रकांत शिंदे यांनी केली. सदर आरोपी चंद्रशेखर राजाभाऊ अन्वीकर यापूर्वी गंगापूर, फुलंब्री येथील कार्यालयात होता. येथे त्याची कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्यामुळे मागील वर्षी सिल्लोड येथे त्याची बदली करण्यात आली होती. त्याच्या त्रासाला अनेक लोक कंटाळले असल्याची माहिती आहे.