औरंगाबाद : हवामान बदलाने निर्माण होत असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन पीक उत्पादकतेत वाढ करणे काळाची गरज बनली आहे. राज्य शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ४०६ गावांची निवड करण्यात आली आहे. यात पहिल्या टप्प्यात ७७ गावांचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे सततच्या दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांमध्येही जागरूकता निर्माण झाली असून, या प्रकल्पाचा फायदा घेण्यासाठी १४,६०० अर्ज प्राप्त झाले आहेत.६० ते ७० टक्के शेतकºयांची शेतीधारण क्षमता २.५ ते ३ एकर आहे. त्यामुळे मान्सूनवर अवलंबून असणारी शेती आणि त्यात कमी शेतीधारण क्षमता लक्षात घेता, यापुढील काळात हवामानावर आधारित शेती करणाºयांचाच टिकाव लागणार आहे. कमीत कमी जोखीम आणि जास्तीत जास्त शाश्वत उत्पादन, अशी शेती पद्धती अवलंबिणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे. यासाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातील ७० टक्के रक्कम जागतिक बँक तर उर्वरित ३० टक्के रक्कम राज्य शासन उभारत आहे. यात मराठवाड्यातील ८, विदर्भातील ६, खान्देशातील १, अशी १५ जिल्ह्यांतील ५,१४२ गावांची निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ४०६ गावांचा समावेश आहे. यात पहिल्या टप्प्यात ७७, दुसºया टप्प्यात १३५ व तिसºया टप्प्यात १३५ गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात बांधावर वृक्ष लागवड, फळबाग, शेडनेट, पॉलिहाऊस, सामूहिक शेततळे, सुरक्षित शेती, बंदिस्त शेळीपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, मत्स्य शेती, रेशीम शेती, गांडूळ युनिट, सेंद्रिय निविष्ठा युनिट, विहीर पुनर्भरण, इतर कृषी आधारित उद्योगांचा समावेश आहे. यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांसाठी मार्गदर्शन व अर्थसाह्य करण्यात येणार आहे. याकरिता ग्रामस्तरावर ५९ ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत. तर १००३ सदस्य आहेत. प्रकल्पात सहभागी होण्यासाठी पहिल्या टप्प्यातील ७७ गावांतून १४,६०० शेतकºयांनी अर्ज सादर केले आहे. त्यातील १,७६१ जणांना पूर्व परवानगी दिली आहे. उर्वरित पूर्व परवानगी येत्या १५ दिवसांत देण्यात येणार आहे. \
कृषी विभागातील अधिकाºयांनी सांगितले की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत नोंदणीकृत महिला बचत गट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, भूमिहीन शेतमजूर गट यांना प्रकल्प उभारण्यासाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
हवामान अनुकूल तंत्रज्ञान १६ शेतीशाळाहवामान अनुकूल तंत्रज्ञान शिकविण्यासाठी जिल्ह्यात शेतीशाळा सुरू झाल्या आहेत. यात औरंगाबाद तालुका-२, फुलंब्री- २, सिल्लोड- २, कन्नड-५, खुलताबाद- ३, गंगापूर- २, अशा एकूण १६ शेतीशाळा सुरू आहेत. प्रत्येक शेतीशाळेत ३० याप्रमाणे ४८० जण यात प्रशिक्षण घेत आहेत. यात माती परीक्षण, खत व्यवस्थापन, तंत्र व्यवस्थापन आदी विषयांचा समावेश आहे.