औरंगाबाद: प्रहार जनशक्ती पक्षाचे बॅनर हातात घेऊन, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याविरूध्द घोषणा देत २५ ते ३० कार्यकर्ते गुरूवारी दुपारी अचानक शिवाजीनगर जलकुंभावर चढले. पोलीस आणि जनतेचे लक्ष वेधून घेत त्यांनी एकापाठोपाठ दोन पुतळे जाळले. एकाने अंगावर रॉकेल ओतून घेतले. अन्य कार्यकर्त्यांनीच त्याला आवरले. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच ठेवले.
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा आणि शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर माफी मागावी, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजेपासून शिवाजीनगर जलकुंभावर चढून आंदोलन सुरू केले. पोलीस अधिकाऱ्यांनी वारंवार विनंती करूनही ते जलकुंभावरुन उतरले नाही. आंदोलकांपैकी काही जण कपडे काढून घोषणा देत होते, तर काही तेथे पडलेले कुलरचे प्लास्टीक खोके आणि लाकडी बॉक्स अधूनमधून जाळून लक्ष वेधून घेत होते. या आंदोलनात सुधाकर शिंदे, बाळू भोसले, अमोल ढगे, दीपक चिकटे, राम गाडेकर, मंगेश साबळे, सुदाम गायकवाड, यांच्यासह सुमारे २५ ते ३० कार्यकर्ते सहभागी झाले होते.
चौकट
काय आहेत मागण्या
- शेतकरी विरोधी काळे कायदे तत्काळ रद्द करा.
-दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाविषयी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी.