‘दोन ते तीन महिने झाले आणि कुठेच रुग्ण नाही, असे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत कोरोना राहील. रुग्ण निघणे बंद होईल, तेव्हा कोरोना संपेल’
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : भारतात ज्याही कोरोना लसीला मान्यता मिळेल, ती सगळ्या क्लिनिकल ट्रायल, सेफ्टी ट्रायल आणि इतर सगळ्या गोष्टीतून पास झाल्यानंतर येईल. स्वयंसेवकांवर डोस दिलेले असतील. सर्व प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरच लसीला लायसन्स मिळेल. त्यानंतरच लस दिली जाणार आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाविषयी विनाकारण भिती बाळगता कामा नये, असे जागतिक आरोग्य संघटनेेचे प्रतिनिधी डॉ. मुजीब सय्यद म्हणाले. लसीकरण प्रशिक्षणदरम्यानचा हा संवाद.
प्रश्न : कोरोनाच्या नव्या विषाणूचा किती धोका आहे?
उत्तर : नवीन बदल झालेला कोरोनाचा विषाणू (स्ट्रेन) ब्रिटनमध्ये सापडला आहे. रंगरुप बदलले असले तरी तो अधिक धोकादायक आहे, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. शिवाय महाराष्ट्रात हा नवा विषाणू नाही. त्यामुळे सध्यातरी कोणताही धोका नाही.
प्रश्न : कोरोनाचा दुसरा लोटची किती शक्यता?
उत्तर : कोरोनाच्या दुसर्या लाटेचा अंदाज, शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यातून पुरेशी दक्षता घेण्यात आली आहे. आगामी काळात लसीकरणामुळे फायदा निश्चित होईल. पण दुसरी लाट येईल की नाही, हे सध्या तरी खात्रीपूर्वक सांगता येणार नाही.
प्रश्न : कोरोना लसीकरणाविषयी काय सांगता येईल?
उत्तर : ज्यांची नोंदणी होईल, त्यांना टप्प्याटप्प्यानुसार लस दिली जाणार आहे. लसीकरणाविषयी विनाकारण कोणतीही भिती बाळगू नये. कारण सर्व प्रक्रियातून पास झालेली लस येईल. त्यामुळे लस सुरक्षितच राहिल.
प्रश्न : वैद्यकीय क्षेत्रासमोर नवे आव्हान कोणते वाटते?
उत्तर : काेरोना लसीकरण हेच सध्या तरी वैद्यकीय क्षेत्रासमोरील नवे आव्हान आहे. लसीकरण कार्यक्रम अधिक चांगल्या पद्धतीने राबविला जाईल. ऐवढ्या मोठ्या लोकसंख्येत प्रत्येकाला लसीचे दोन डोस द्यावे लागणार आहे. अनुभव आणि तयारी यातून हे आव्हान निश्चितपणे यशस्वीपणे पेलले जाईल. काही अफवा पसरण्याचीही शक्यता आहे. त्या दूर करून लोकांना योग्य माहिती, लसीकरणाचे महत्व सांगावे लागेल.
प्रश्न : कोरोना पूर्णपणे कधी संपेल?
उत्तर : कोरोना हा न दिसणारा शत्रू आहे. डोळ्यांनी हा विषाणू दिसत नाही. रुग्णांच्या माध्यमातूनच तो दिसतो. त्यामुळे दोन ते तीन महिने झाले आणि कुठेच रुग्ण नाही, असे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत कोरोना राहील. रुग्ण निघणे बंद होईल, तेव्हा कोरोना संपेला, असे म्हणता येईल. तोपर्यंत काळजी घ्यावी लागेल.