औरंगाबाद: बहुतांश शिक्षक आणि पदवीधर आमदार हे शिक्षकांच्या चुकांना पाठिशी घालतात. समस्या मांडण्यासाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निर्माण करण्यात आले होते. मात्र, आता या आमदारांची आता गरज उरलेली नाही. त्यांच्या जागी कोरडवाहू शेतकऱ्यांचे आमदार देऊयात, असे आवाहन भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केले.
मागील काही दिवसांपासून शासकीय शिक्षक आणि आ. प्रशांत बंब यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आ. बंब यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्यापासून सुरु झालेला वाद आता सरकारी शाळेतील गुणवत्तेवर आला आहे. याबाबत बोलताना आ. बंब म्हणाले, पटसंख्येच्या तुलनेत राज्यात शिक्षकांची संख्या अधिक निघेल. सर्वसुविधा असतानाही शिक्षणाचा दर्जा का सुधारत नाही? दर्जा चांगला नाही म्हणून शिक्षक तालुक्याच्या ठिकाणी राहतात. त्यांची मुले खाजगी शाळेत शिक्षण घेतात. ७० टक्के शिक्षकांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. मुख्यालयी न राहता तेथील खोटी कागदपत्रे देऊन भत्ता घेतला जातो, असा आरोप देखील आ. बंब यांनी केला. तसेच २४ वर्षांपासून शिक्षक आमदार प्रश्न सोडवत नाहीत. या मतदारसंघ बंद करून शिक्षक आमदारांच्या ठिकाणी कोरडवाहू शेतकऱ्यांतून आमदार निवडावे, अशी भूमिका आ. बंब यांनी मांडली.
शिक्षकांच्या घरी जाऊन स्वागत करायेत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन आहे. यानिमित्ताने गावात राहणाऱ्या शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त करावी. गावच्या सरपंच, किंवा शालेय समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य यांनी मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षणाच्या घरी जाऊन त्यांचे स्वागत करावे. मी स्वतः दिवसभरात शक्य तेवढ्या गावात जाणार आहे, असे आवाहनही आ. बंब यांनी केले.