वाळूज महानगर : वाळूज गावातील रस्ता दुभाजकावरील जोड बंद करण्यात आल्यामुळे वाहतुकीचा फज्जा उडत असून, वाहनधारकांना वळसा टाकुन ये-जा करावी लागत आहे. गावातून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना वळणासाठी जागा नसल्यामुळे अनेक वाहनधारक विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प होत आहे.
औरंगाबाद-नगर महामार्गावर अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याचे कारण दर्शवून पोलीस प्रशासन व पथकर वसूल करणाºया के.टी.संगम कन्सट्रॅक्शनच्या वतीने वाळूजपासून इसारवाडी फाट्यापर्यंत ठिकठिकाणी असलेले दुभाजकावरील जोड काँक्रीट टाकून बंद करण्यात आले आहेत.
या प्रमुख मार्गावरील वाळूज, लिंबेजळगाव, दहेगाव आदी गावांतून जाणाºया दुभाजकावरील जोड बंद करण्यात आल्याने या गावांतील वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
वाळूज गावातील लायननगर व जिल्हा परिषद शाळेसमोरील दुभाजकाचे जोड बंद केल्यामुळे जोगेश्वरी, रांजणगाव, कमळापूर, घाणेगाव तसेच वाळूजच्या नवीन वसाहतीतील वाहनधारकांना गंगापूर व नगरच्या दिशेने जाण्यासाठी थम्सअप कंपनीपर्यंत वाहने न्यावी लागत आहेत.
हा जवळपास अर्धा किलोमीटरचा फेरा वाचविण्यासाठी या मार्गावरुन ये-जा करणारे वाहनधारक व दुचाकीस्वार शॉर्टकटच्या नादात विरुद्ध दिशेने ये-जा करीत आहेत. औरंगाबाद-नगर हा प्रमुख महामार्ग असल्यामुळे या महामार्गावर रात्र-दिवस हजारो वाहनांची ये-जा सुरु असते. अशातच दुभाजकाचे जोड बंद करण्यात आल्यामुळे वाहनधारक विरुद्ध दिशेने जात असल्याने वाळूजवासियांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.