औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित पीएच.डी. मार्गदर्शकांची वर्षातून एकदा कार्यशाळा घेत त्यांच्याशी कुलगुरूंनी संवाद साधावा, पीएच.डी.च्या व्हायवानंतर होणाऱ्या जेवणावळीवर बंदी घातली जावी, अशी मागणी करणारे पत्र अधिसभा सदस्य प्रा. संभाजी भोसले यांनी कुलगुरूंना पाठविले आहे.
विद्यापीठातील अधिष्ठातांनी पीएच.डी. व्हायवासाठी पैसे मागितल्याचे प्रकरण गाजत आहे. या पार्श्वभूमीवर पदवीधर गटातील अधिसभा सदस्य प्रा. संभाजी भोसले यांनी कुलगुरूंना पत्र पाठवून दहा मागण्या केल्या आहेत. याशिवाय विद्यापीठातील पीएच.डी. विभागात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि विद्यार्थ्यांचीही कार्यशाळा होणे गरजेचे आहे. याविभागाचा प्रमुख हा अभ्यासू अधिकारी असावा, त्याचा या विभागाविषयी अभ्यास असला पाहिजे, त्यांच्याकडे इतर कोणतीही जाबाबदारी दिली जाऊ नये, संशोधक विद्यार्थ्यांशी केला जाणार पत्रव्यवहार वेळेत केला जावा, या विभागातील कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या पायाभूत सेवा सुविधा पुरविल्या पाहिजेत, परदेशी विद्यार्थ्यांसाठी एक खिडकी योजना राबविण्यात यावी, अशा विविध दहा मागण्या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत.
छळ करणाऱ्यावर कारवाई कराविद्यार्थ्यांची छळवणूक करणाऱ्या प्रत्येकावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी आग्रही मागणीही या पत्रात केली आहे. या अधिकारी, गाईडच्या वागण्यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे कारवाई करताना कठोरातील कठोर शिक्षा दोषींना दिली जावी, असे या पत्रात म्हटले आहे.