औरंगाबाद : सुमारे दहा वर्षांपूर्वी बंद पडलेले मोहाडी (ता. कन्नड) येथील महाविद्यालय नियमबाह्यरीत्या सुरूकरण्यासाठी विद्यापीठातील यंत्रणा राबत आहे. विशेष म्हणजे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी स्वत: या प्रकरणात रस दाखविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. २००१ मध्ये सातपुडा विकास मंडळ (ता. रावेर) चे मोहाडी येथे सुरूझालेले वरिष्ठ कला महाविद्यालय २००६-०७ या वर्षी बंद पडले. त्यामुळे विद्यापीठाने याठिकाणी २००६ ते २०११ आणि २०११ ते २०१६ च्या बृहत आराखड्यात सतत दहा वर्षे नवीन महाविद्यालयाची तरतूद केली. त्यानुसार २८ एप्रिल २०१४ मध्ये ग्रामीण विकास प्रसारक मंडळाच्या पद्मावती कला व विज्ञान महाविद्यालयाला परवानगी मिळून हे महाविद्यालय सुरूझाले. बंद पडलेले वरिष्ठ कला महाविद्यालय सुरूकरण्यासाठी ‘सातपुडा’ संस्थेने आता जून २०१६ पासून महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरूकेले आहेत. प्राप्त माहितीनुसार हे महाविद्यालय सुरूकरण्यासाठी काही मंडळींनी कंत्राटच घेतले आहे. बंद पडलेले महाविद्यालय सुरूकरण्यासंदर्भात संलग्नीकरण समिती नेमण्यास यापूर्वीचे बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे यांनी नकार दिला होता. त्यांच्या नकारानंतर कुलगुरूंनी स्वत: हा विषय आपल्या अखत्यारीत घेतला. ८ जून २०१६ ला ‘सातपुडा’ संस्थेने महाविद्यालय पुनर्संलग्नीकरणासाठी अर्ज दाखल केला. मागील पाच वर्षांची संलग्नीकरण फीदेखील एकदाच भरली. विद्यापीठानेही ती नियमबाह्यरीत्या स्वीकारली. त्यानंतर पी. पी. कलावंत यांनी स्वत:च्या स्वाक्षरीने १७ जून २०१६ रोजी संलग्नीकरण समिती नेमली. त्यांनी बीसीयूडी संचालकांना डावलून उपकुलसचिव पी. पी. कलावंत यांच्या सहीने संलग्नीकरणाची पत्रे तयार करून ती ‘सातपुडा’ संस्थेला धाडली आहेत. बीसीयूडींचा अधिकार याठिकाणी कुलगुरूव उपकुलसचिवांनी बेकायदेशीररीत्या वापरल्याचे स्पष्ट होत आहे. संलग्नीकरण समितीत नेमलेली नावे लक्षात घेतल्यानंतर विद्यापीठ आणि कुलगुरूकोणत्या पद्धतीने काम करीत आहेत, याचे दर्शन होते. या समितीने आपला अहवाल दिला आहे. मात्र, सध्याचे बीसीयूडी संचालक डॉ. सतीश पाटील म्हणाले की, अशी कोणतीही समिती गेलेली नाही. एक समिती जूनमध्ये नेमल्यानंतर आणि त्या समितीने अहवाल दिल्यानंतर पुन्हा सप्टेंबरमध्ये कुलगरूंनी समिती नेमण्याचे कारण काय ते स्पष्ट होत नाही.
बंद महाविद्यालय सुरूकरण्याचा घाट
By admin | Published: October 09, 2016 12:47 AM