अंबाजोगाई: महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मागील पाच दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. आज मंगळवारी स्वत: तहसीलदारही या कामबंद आंदोलनात सहभागी झाल्याने कामकाज ठप्प राहिले. महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेच्या वतीने १ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. विविध मागण्यांकरिता प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. मागील पाच दिवसांपासून कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्याने अनेक विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रांचे वितरण रखडले आहे. प्रवेश प्रकियेची अंतिम तारीख जवळ आलेली असतांना महसूल कर्मचाऱ्यांचा हा संप महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. मंगळवारी स्वत: तहसीलदार या आंदोलनात सहभागी झाल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.पीकविमा भरण्याची मुदत वाढली. मात्र, कर्मचारी संपावर असल्याने शेतकऱ्यांनाही या आंदोलनाचा फटका सहन करावा लागत आहे. अंबाजोगाईत या आंदोलनात तहसीलदार राहुल पाटील, नायब तहसीलदार बाळासाहेब वांजरखेडकर, डी. एस. इटलोड, पी. एल. गोपड, परवीन पठाण, पी. सत्यनारायण, शेख समीउल्ला, जी. एस. जिडगे, एस. बी. गायकवाड, संतोष जाधव, खडकीकर, शेख अन्वर, यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत. (वार्ताहर)
बंदमुळे विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रासाठी हाल
By admin | Published: August 06, 2014 12:44 AM