वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने जवळपास ५ हजार छोट्या-मोठ्या व्यावसायिकांत चिंतेचे वातावरण पसरले असून, हातावर पोट असणारे व छोटे व्यावसायिक राेजगार बुडण्याच्या भीतीने हादरले आहेत.
वर्षभरापूर्वी आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे वाळूज उद्योगनगरीतील अनेक कामगारांचा रोजगार हिरावला गेला आहे. या संकटामुळे उद्योजकाबरोबर हातावर पोट असणारे कामगार, छोटे व्यावसायिक व नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला होता. कोरोनामुळे अनेक परप्रांतीय कामगार मूळगावी निघून गेले असून काही कामगार उद्योगनगरीत परत आले आहेत. दिवाळीनंतर उद्योगनगरीतील विस्कटलेली आर्थिक घडी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. असे असतानाच आठवडाभरापासून शहर व ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असल्यामुळे उद्योजक, कामगार व व्यावसायिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी शासनाकडून गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार
लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्यामुळे कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, असा प्रश्न अवधेश शर्मा, फकीरचंद जंगले, सुभाष शर्मा, रामभवन यादव, तुलसी सिंह, गणेश पाटेकर, बाबासाहेब मेटे, शेख मन्सुर, संतोष नाडे आदी हातावर पोट असणारे कामगार व छोट्या व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.
व्यावसायिकांना चिंता
बजाजनगरात १५००, रांजणगावात ८, पंढरपुरात ४००, वाळूज ३००, जोगेश्वरी १५० तसेच औद्योगिक क्षेत्रात जवळपास १२०० असे एकूण ५ हजार छोटे व्यावसायिक आहेत. यात अनेकांनी हॉटेल, खानावळ, गॅरेज, स्टेशनरी आदींचे व्यवसाय सुरू असून अनेकांनी हातगाड्यावर फळे व भाजीपाला विक्रीसह इतर छोटे व्यवसाय थाटले आहेत. याचबरोबर एमआयडीसी परिसरात जवळपास ८० हजार कंत्राटी कामगार आहेत. लॉकडाऊनच्या भीतीमुळे त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न उभा राहणार आहे.