यावर्षी झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे झालेल्यांपैकी निम्म्याच शेतकऱ्यांना शासनाच्या आर्थिक मदतीचा फायदा झाला, तर निम्मे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे कपाशीवरील बोंडअळीने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. बागायती क्षेत्रात जिथे एकरी १४ ते १५ क्विंटल उत्पन्न मिळायचे तिथे दोन क्विंटलच हातात आले. कोरडवाहू क्षेत्रावरील कपाशीची याहून वेगळी परिस्थिती नाही. अशा एकामागून एक आलेल्या संकटांशी सामना करून रबी पिकांची पेरणी केली.
रबीतील गहू, हरभरा पिकांचे कोंब तरळू लागले आणि आकाशातही ढग दाटून आले. ठराविक दिवसांनंतर ढगाळलेले हवामान पिच्छा सोडेना. त्यामुळे थंडी गायब झाली. परिणामी हरभरा, तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढला, तर गव्हावर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला. प्रत्येक पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी ऊस पिकाकडे वळले असून, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड होत आहे.
चौकट
कांदा उत्पादक धास्तावले
बदलते वातावरण आणि मधूनच पावसाच्या सरींमुळे कांद्याच्या रोपाचे नुकसान झाले. जे रोप वाचले त्याची लागवड सुरू आहे. मात्र, ढगाळ वातावरणाने त्याच्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. यावर्षी कांदा बियाण्याला मिळालेला भाव पाहून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा बिजवाईची लागवड केली आहे. मात्र, गारपीट झाल्यास काहीही शिल्लक राहणार नाही, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.
चौकट
तालुक्यातील रबी पिकांची स्थिती
तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून मिळालेल्या रबी पीक पेरणीच्या प्राथमिक अहवालानुसार तालुक्यात रबी ज्वारी २ हजार ८१८ हेक्टर, गहू १५ हजार ६२८ हेक्टर, हरभरा ७ हजार ५९३ हेक्टर, मका ८ हजार २८० हेक्टर, कांदा बिजवाई ३ हजार ७५२ हेक्टर, नवीन ऊस लागवड ५८३ हेक्टर, बटाट्याची ६०६ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.