नव्या ‘एमआरआय’ने रुग्णांची तपासणी सुरू
औरंगाबाद : शिर्डी संस्थानने घाटी रुग्णालयास दिलेल्या निधीतून एमआरआय यंत्र घेण्यात आले. हे यंत्र कार्यान्वित झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून या यंत्राद्वारे चाचणी (ट्रायल) केली जात आहे. त्यासाठी रोज काही रुग्णांचे एमआरआय काढण्यात येत आहे. हे यंत्र नियमितपणे सुरू होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
-------------
आरटीओ कार्यालयात
गर्दीचे नियोजन होईना
औरंगाबाद : दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी सुरू झालेल्या आरटीओ कार्यालयात सोमवारी विविध कामांसाठी आलेल्या वाहनचालकांची एकच गर्दी झाली. लर्निंग लायसन्ससाठी आलेल्या उमेदवारांची थेट कक्षाबाहेरपर्यंत रांग लागली होती. हीच स्थिती अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर होती; परंतु सोशल डिस्टन्सचे पालन होईल, यादृष्टीने कार्यालयात नियोजनच नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात
औरंगाबाद : महावितरणच्या वाळूज शहर उपविभागीय कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती रविवारी उत्साहात साजरी करण्यात आली. अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रवीण जोशी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपविभागात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ, शैक्षणिक साहित्याचा संच व ‘सावित्रीबाई फुले यांचे विचार व कार्य’ हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सहायक अभियंता मनीष डिगोळे, मानव संसाधन लिपिक औताडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------
विनाक्रमांक नवी वाहने रस्त्यावर
औरंगाबाद : क्रमांक प्राप्त झाल्यानंतरच नव्या वाहनांचा ताबा ग्राहकांना देणे बंधनकारक आहे; परंतु शहरातील रस्त्यांवर विनाक्रमांकाची वाहने धावताना सर्रास दिसत आहेत. त्यामुळे क्रमांक प्राप्त होण्यापूर्वीच वाहनांचा ताबा मिळत असल्याची परिस्थिती आहे; परंतु याकडे आरटीओ कार्यालयाचे साफ दुर्लक्ष होत आहे.