औरंगाबाद : पैठण मार्गावर जनता बसेस सोडण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या एका माजी पदाधिकाऱ्याने सोमवारी दुपारी मध्यवर्ती बसस्थानकात चांगलाच गोंधळ घातला. बराच वेळ थांबूनही बस येत नव्हती. जी बस आली, ती अवघ्या काही क्षणात प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरून गेली. त्यामुळे या माजी पदाधिकाऱ्याने थेट ‘एस. टी.’ च्या टपावर चढून तासभर पैठण मार्गावरील बससेवा बंद पाडली.शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अरुण काळे हे सोमवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास पैठणला जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात आले होते. यावेळी फलाट क्रमांक ९ वर बोकुडजळगाव, चितेगाव, बिडकीन, ढोरकीन, एमआयडीसी पैठण आणि पैठण याठिकाणी जाणारे २०० पेक्षा अधिक प्रवासी थांबलेले होते.परंतु बराच वेळ होऊनही बस येत नव्हती. त्यामुळे अरुण काळे आणि इतर प्रवासी चौकशी कक्षात गेले. तेथून ते अधिकाऱ्यांकडे गेले. याठिकाणी जादा बसेस सोडण्यात येतील, असे त्यांना सांगण्यात आले. बऱ्याच प्रतीक्षेनंतर एक बस सोडण्यात आली; परंतु ही बस अवघ्या काही वेळेत भरून गेली. अरुण काळे यांच्यासह अनेक प्रवाशांना जागा मिळाली नाही. अरुण काळे हे थेट प्रवाशांनी भरलेल्या बसच्या टपावर चढले. विनावाहक बसऐवजी जनता बस सोडण्याची मागणी करून त्यांनी टपावर तासभर ठिय्या मांडला. अनेक प्रवाशांनी त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे बसस्थानकात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पैठण मार्गावरील बससेवा बंद पडली. त्यांच्या पवित्र्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांशी त्यांचा वाद झाला. त्यामुळे काळे यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. मध्यवर्ती बसस्थानकातील अधिकारी-कर्मचारीही पोलीस ठाण्यात गेले.जनता बसेस सोडाव्यातपैठण मार्गावर विनावाहक बसेस सोडण्यात येत असल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर जनता बसेस सोडल्या पाहिजेत. गैरसोयीमुळे हा प्रकार झाला. यात कोणतीही स्टंटबाजी नव्हती, असे अरुण काळे म्हणाल.