औरंगाबाद- शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर पूर्ण ताकदीने पहिल्यांदाच औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात आज सायंकाळी ६ वाजता सभा होणार आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखा स्थापनेला ८ जून रोजी ३७ वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने होणाऱ्या 'हिंदुत्वाचा हुंकार' या घोषवाक्यासह मुख्यमंत्र्यांच्या सभेचा जोरदार प्रचार केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या सभेनिमित्त शिवसेना मोठ्या ताकदीने शक्तिप्रदर्शन करणार आहे. खासदार संजय राऊत, मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे, नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच शहरात १० हजार भगवे ध्वज, २०० होर्डिंग, स्वागत बॅनर, चौकाचौकांत सर्वत्र भगवे ध्वज फडकविण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधील याच मैदानात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच औरंगाबादचं नामांतर करण्याची मागणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. त्यामुळे राज ठाकरेंच्या या टीकेला आज उद्धव ठाकरे काय उत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेपूर्वी मनसेने निशाणा साधला आहे. होय..संभाजीनगर असे म्हणत बॅनरबाजी करायची..मी संभाजीनगर म्हणतोय ना असं सभेत म्हणायचं ,एवढं करून झालं का? औरंगाबादचे संभाजीनगर कधी होणार मुख्यमंत्री महोदय?, असा सवाल मनसेचे नेते गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे. संभाजीनगरला असलेलं औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत करायची घोषणा सभेत होणार का?, असा सवाल उपस्थित करत भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरून आल्यावर अवघड वाटतंय सगळं, असा टोलाही गजानन काळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या सभेला प्रतिसाद मिळण्यासाठी दौलताबाद येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात यज्ञ करण्यात आला. सभेला गर्दी होण्याच्या अनुषंगाने शिवसेना पदाधिकारी नागरिकांना निमंत्रण देत आहेत. मराठवाडा पातळीवर नेत्यांनी दौरे करुन सभेचे नियोजन केले आहे. परभणीतून येणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसाठी रेल्वेचे २४ डबे बुक करण्यात आले आहे. सोशल मीडियावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेचे टीझर व्हायरल करण्यात आले आहे.
नामांतरणाचा कुठलाही प्रस्ताव नाही - केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड
मराठवाड्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामकरणाचा मुद्दा सध्या जोर धरत आहे. दरम्यान, या शहरांच्या नामांतराचा कुठलाही प्रस्ताव केंद्राकडे आलेला नसून, काहीजण हवेत बाता मारत आहेत, असा गौप्यस्फोट केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला आहे. 'लोकमत'शी बोलताना कराड यांनी ही माहिती दिली.