औरंगाबाद : शहरात डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत सीजीडी (सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन नेटवर्क)अंतर्गत घरोघरी गॅसपुरवठा होईल, असे आश्वासन केंद्रीय पेट्राेलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी बुधवारी येथे दिले. तसेच मराठवाड्यातील उद्योग, रोजगार वाढीसाठी गॅस वितरण यंत्रणा महत्त्वाची ठरेल, असेही पुरी यावेळी म्हणाले. अहमदनगर-औरंगाबाद या नोडमध्ये ४ हजार कोटींतून होणाऱ्या ‘हर घर गॅस’ याेजनेचे ऑनलाइन भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रिमोटची कळ दाबून भूमिपूजनाच्या कोनशिलेचे अनावरण केले. आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, आ. प्रशांत बंब यांची यावेळी उपस्थिती होती. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर उभारलेल्या भव्य व शानदार शामियान्यात हा कार्यक्रम झाला.
पुरी म्हणाले, मराठवाड्यातील सीएनजी नेटवर्कचे औरंगाबाद गेट वे ठरणार आहे. येथूनच विभागातील पुढील शहरांमध्ये गॅस डिस्ट्रिब्युशन नेटवर्क विकसित होईल. औरंगाबाद मराठवाड्याच्या विकासाचे प्रमुख अंग आहे. उद्योग, रोजगार वाढीसाठी गॅस वितरण यंत्रणा महत्त्वाची ठरेल. औरंगाबादमध्ये उत्तम जीवनसुविधा असाव्यात यासाठी राज्यमंत्री डॉ. कराड प्रयत्नशील आहेत, असे उद्गार त्यांनी काढले. यावेळी आ. सावे, आ. बागडे यांची यावेळी भाषणे झाली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमित गोयल, बीपीसीएलचे सीएमडी अरुणकुमार जैन, योजनेचे प्रमुख श्रीपाद मांडके, भाजपा शहराध्यक्ष संजय केणेकर, बसवराज मंगरुळे आदींची उपस्थिती होती.