औरंगाबाद : महापालिकेच्या नागरी मित्र पथकांनी मंगळवारी सात कोचिंग क्लासेसवर दंडात्मक कारवाई करत ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेसवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. १८ फेब्रुवारीपासून महापालिकेच्या नागरी मित्र पथकांनी कारवाई सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी ४३ कोचिंग क्लासेसची तपासणी करत सहा क्लासेसवर दंडात्मक कारवाई केली होती. पाचवी ते नववी, अकरावीचे खाजगी क्लासेस बंद करण्यात आले आहेत. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खाजगी क्लासेस सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. याठिकाणी कोरोना नियमांचे पालन होते आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी पालिकेने नागरी मित्र पथके कामाला लावली आहेत. शुक्रवारी पहिल्याच दिवशी या पथकांनी ४३ क्लासेसची तपासणी केली. यातील सहा ठिकाणी कोरोनासंदर्भात उपाययोजना केल्या जात नसल्याचे व नियम पाळले जात नसल्याचे समोर आले. दंडात्मक कारवाई करत पथकांनी ३० हजार रुपयांचा दंड वसूल केला. याच पार्श्वभूमीवर मंगळवारीदेखील शहरात विविध ठिकाणी या पथकांनी कारवाई करत कोरोना नियमांचे पालन न केल्यामुळे सहा कोचिंग क्लासेसकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
या कोचिंग क्लासेसवर केली कारवाई
थर्मलगन व ऑक्सिमीटर नसल्यामुळे एन-६ सिडको येथील तुळजाई अभ्यासिका व समर्थनगरातील यश अभ्यासिका यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. विवेकानंद कॉलेजमागील अभिज्ञ अकॅडमीलाही पाच हजारांचा दंड करण्यात आला. एन-३ सिडको येथील गोयल अभ्यासिकेत सोशल डिस्टन्सिंग दिसून आले नाही, तसेच येथील कर्मचाऱ्यांनी कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट केलेली नव्हती. त्यामुळे या अकॅडमीस पाच हजारांचा दंड करण्यात आला. कामगार चौकातील बिडवे ज्ञान प्रबोधिनी येथील कर्मचाऱ्यांनीही आरटीपीसीआर टेस्ट केलेली नसल्याने पाच हजारांचा दंड आकारला.
चौकट..
आदेशानंतरही अकरावीचा वर्ग सुरू
एन-४ सिडको येथील असावा ब्रदर्समध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर बसविण्यात आला होता. शिवाय येथे बंदी असतानाही अकरावीचा वर्ग सुरू होता. त्यामुळे संबंधितास दहा हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली.