पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी या लसी आणण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पैठण महसूल विभागाचे डॉ. स्वप्निल मोरे, गटविकास अधिकारी विजय लोंढे यांनी अगोदर लसीकरण केंद्राची पाहणी केली.
शनिवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयात मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते कोरोना लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीपान काळे, डॉ. शिवाजी भोजने, डॉ. साकीब सौदागर, डॉ. रोहित जैन यांना कोरोनाची लस दिली. लसीकरणाच्या माध्यमातून आपण दिलासादायक पाऊल टाकल्याचे मत यावेळी भुमरे यांनी व्यक्त केले. दिवसभरात शंभर आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. यावेळी पैठण कृउबाचे सभापती राजू भुमरे, उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्निल मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, गटविकास अधिकारी विजय लोंढे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी महेश लड्डा, आदींची उपस्थिती होती.