औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महापालिका प्रशासनाने तब्बल ७५० कंत्राटी कर्मचारी घेतले होते. या कर्मचाऱ्यांची सेवा दि. ३१ ऑगस्टपासून थांबविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. बुधवारी रात्री उशिरा मनपा प्रशासक यांनी ६१४ कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एवढे कंत्राटी कर्मचारी नेमले तरीही कमीच पडत होते. कारण रुग्णसंख्याच खूप वाढली होती. शहरात तब्बल २३ सीसीसी सेंटरवर रुग्णांवर उपचार सुरू होते. गंभीर रुग्णांना खासगी, घाटी रुग्णालयातही दाखल करावे लागत होते. कोरोनाच्या मागील दोन लाटांचा अनुभव लक्षात घेता ७५० पैकी किमान ५० टक्के कर्मचारी तूर्त कमी करावेत, असा प्रस्ताव आरोग्य विभागामार्फत प्रशासकांना सादर करण्यात आला होता. रात्री उशिरा ६१४ कर्मचाऱ्यांची सेवा थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाशी संबंधित विविध कामे करण्यासाठी फक्त १३६ कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर ठेवण्यात आले आहेत. यामध्ये ८ एमबीबीएस, ५ आयुष, १ हॉस्पिटल मॅनेजर, ५० नर्सिंग स्टाफ, २ एक्सरे टेक्निशियन, २ ईसीजी टेक्निशियन, ७ डाटा एन्ट्री ऑपरेटर, १० वॉर्ड बॉय, १० महिला वॉर्ड सेविका, आदींचा समावेश आहे.
सप्टेंबर अखेरपर्यंत शहरात तिसऱ्या लाटेचे आगमन होईल, असा कयास आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून सक्रिय रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना परत कंत्राटी पद्धतीवरच घ्यावे लागणार आहे. महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाने कोरोनातील सर्व कंत्राटी कर्मचारी कमी करावेत, असे आदेश मनपा प्रशासनाला दिले होते.