औरंगाबाद : वसंतराव नाईक चौक, सिडको ते जयभवानीनगर शिवाजी महाराज चौकमार्गे मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्याच्या कामाची सुरुवात आ. अतुल सावे यांच्या हस्ते नारळ फोडून बुधवारी करण्यात आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महापालिकेची परवानगी नव्हती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरातील सर्व रस्त्यांचे संयुक्त भूमिपूजन १२ डिसेंबर रोजी केल्यानंतर बुधवारी पुन्हा भाजपाने कुदळ मारून नारळ फोडल्यामुळे शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना- भाजपात श्रेयवाद उफाळून आला आहे. पाच वर्षांनंतर जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यासाठी मुहूर्त लागला असून, त्यातही श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. गेल्या सरकारने त्या रस्त्यासाठी ५ कोटी मंजूर केले. मनपाने निविदेसह वर्कऑर्डर मंजूर केली नाही, असा आरोप भाजपाने मध्यंतरी केला होता. रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या अनुषंगाने मालमत्ता पाडल्या. मात्र, रुंदीकरण रखडले. पावसाळ्यात त्या रस्त्यावरून जयभवानीनगर, विश्रांतीनगर, राजनगर, मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात जाणे नागरिकांना यातना देणारे ठरले. बुधवारी भाजपाने केलेल्या भूमिपूजनाप्रसंगी प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे, माधुरी अदवंत, मनीषा मुंडे, गोविंद केंद्रे, कैलास गायकवाड, बालाजी मुंडे, लक्ष्मीकांत थेटे, संजय बोराडे, रामेश्वर दसपुते, ताराचंद गायकवाड, अर्जुन गवारे यांच्यासह रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर हरविंदरसिंग बिंद्रा यांची उपस्थिती होती.
भाजपाकडून लाजिरवाणा प्रकार
भाजपाने बुधवारी केलेले भूमिपूजन म्हणजे लोकांच्या लेकरांना स्वत:चे नाव देण्याचा लाजिरवाणा प्रकार असल्याची खोचक टीका शिवसेना पूर्व मतदारसंघ संघटक राजू वैद्य यांनी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते १५२ कोटी रुपयांच्या रस्त्यांचे भूमिपूजन झालेले असताना भाजपाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेत भूमिपूजनाचा घाट घातला. प्रशासनातील कोणताही अधिकारी सोबत नसताना बालिशपणे या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न स्थानिक आमदार करीत आहेत.
शहरात आचारसंहिता नाही
सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी सांगितले, ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता शहरात नाही; परंतु जर कुणी शहरात एखादे भूमिपूजन केले असेल आणि त्याचा संबंध थेट एखाद्या ग्रामपंचायतीशी असेल, तर मात्र आचारसंहितेचे उल्लंघन झाले, असे म्हणता येईल.