औरंगाबाद : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जायकवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत टाकण्यात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या कामाचा नारळ दिवाळीनंतर फुटण्याची शक्यता आहे. मुख्य जलवाहिनीच्या कामासाठी कंत्राटदार कंपनी नक्षत्रवाडी किंवा पैठण यांपैकी एका ठिकाणी फॅक्टरी सुरू करणार आहे. त्याचे पाईप येथेच तयार करण्यात येतील. जायकवाडी ते नक्षत्रवाडी या दरम्यान २५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. साधारणत: दिवाळीनंतर मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होईल, अशी शक्यता महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी वर्तविली.
शहरासाठी शासनाने १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे काम करीत आहे. प्राधिकरणाने हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंपनीला ४ फेब्रुवारीपासून काम दिले आहे. शहरात जलकुंभ उभारणे, अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, आदी कामे सुरू असली तरी जायकवाडी ते नक्षत्रवाडी या अंतरातील मुख्य जलवाहिनीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. नवीन योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागणार आहेत. या काळात शहराची पाण्याची मागणी वाढत आहे. काही प्रमाणात त्या मागणीची पूर्तता करण्यासाठी जुन्या पाणीपुरवठा योजनेत सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यासाठी नऊ कोटी रुपये खर्चून आवश्यक त्या सुधारणा, नवीन पंप खरेदी केली जाणार आहे. नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाली तरी जुनी योजना कार्यान्वित राहील. त्यामुळे जुन्या योजनेवरील खर्च वाया जाणार नाही, असा दावा प्रशासकांनी केला.