औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे घाटी रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी विभाग आणि चिकलठाण्यातील मिनी घाटी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासह आरोग्याशी संबंधित रेंगाळत राहिलेले अनेक प्रश्न आचारसंहिता संपल्याने मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.
जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या घाटीतील सुपर स्पेशालिटी विभागाचे काम ९० टक्क्यांवर अडकले आहे. या विभागाच्या विजेच्या जोडणीसाठी २.४० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. मनुष्यबळाचाही प्रश्न रेंगाळलेला आहे. याबरोबर माता व बाळाला एकाच छताखाली उपचार मिळावे, यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत २०० खाटांचा स्वतंत्र माता व बालविभाग (एमसीएच विंग) उभारण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी निधीही मिळाला. परंतु घाटी की, दूध डेअरीच्या जागेत, या विभागाला मुहूर्त मिळाला नाही. हा विभाग घाटीत उभारण्याचे जवळपास निश्चित आहे. मात्र, त्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळण्याची नुसती वाट पाहावी लागत आहे.
चिकलठाणा येथील मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय जूनपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, असे राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक डॉ. अनुपकुमार यादव यांनी मार्चमध्ये औरंगाबाद दौऱ्यात सांगितले होते. मात्र, दोन महिने उलटूनही याठिकाणी अनेक यंत्रसामुग्रींची प्रतीक्षाच आहे. आचारसंहिता असल्याने यंत्रसामुग्री मिळण्यास अडचण येत असल्याचे सांगण्यात आले. यंत्रसामुग्रींशिवाय हे रुग्णालय २४ तास आणि संपूर्ण २०० खाटांसह सुरू होणे अशक्य आहे. परंतु आता आचारसंहिता संपलेली असल्याने हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास गती मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या, सुपर स्पेशालिटी विभागाच्या विजेसाठी २.४० कोटींचा निधी पावसाळी अधिवेशनात मंजूर होईल, अशी आशा आहे. या विभागाच्या मनुष्यबळाचाही प्रस्ताव सादर केलेला आहे. एमसीएच विंगसाठी पाठपुरावा केला जात असून, त्यास लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले, आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होणार आहे. यंत्रसामुग्री प्राप्त होऊन लवकरात लवकर रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होईल, यासाठी प्रयत्न केला जात आहे. महिला रुग्णालयाच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया होऊन लवकरच भूमिपूजन होईल, असे ते म्हणाले.
महिला रुग्णालयाची उभारणी कधी?शहरातील दूध डेअरी येथील जागेत प्रस्तावित शासकीय महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या उभारणीसाठी निधीची तरतूदच झालेली नाही. त्यामुळे या रुग्णालयाची उभारणी रखडणार आहे. ४निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला असून, पहिल्या टप्प्यातील निधी मिळताच या रुग्णालयाचे काम सुरू होईल, याची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे.