वाळूज महानगर : उन्हाळ्याच्या सुरवातीलाच तापमान वाढल्याने वाळूज महानगर परिसरात ठिकठिकाणी विक्रेत्यांनी थंड पेय व फळांची दुकाने थाटली आहेत. आठवडाभरापासून उन्हाचा पारा वाढल्याने उसाचा रस, लस्सी, आईस्क्रीम आदी थंड पेयाची मागणी चांगलीच वाढली आहे.
----------------------
तीसगाव-सिडको रस्त्यावर खड्डे
वाळूज महानगर : तीसगाव-सिडको या मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारकांना कसरत करीतच ये-जा करावी लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे दुचाकीस्वार व चारचाकी वाहनधारकांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे. उद्योगनगरीतून शहरात ये-जा करण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने अनेक कामगार व नागरिक या रस्त्याने ये-जा करीत असतात. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
-------------------------
भाजीपाल्याची दारोदार विक्री
वाळूज महानगर : अंशत: लॉकडाऊनमुळे नागरिकांची भाजीमंडईत वर्दळ कमी झाल्याने भाजीपाला विक्रेते दारोदार जाऊन भाजीपाल्याची विक्री करीत असल्याचे चित्र उद्योगनगरीत पहावयास मिळत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने परिसरात अंशत: लॉकडाऊन सुरु करण्यात आले असून विविध चौकात भाजी मंडई भरवण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक भाजीविक्रेते दारोदार जाऊन स्वस्तात भाजीपाल्याची विक्री करीत आहेत.
-------------------
बजाजनगरातून दुचाकी लांबविली
वाळूज महानगर : बजाजनगरात घरासमोर हॅण्डल लॉक करुन उभी केलेली दुचाकी चोरट्याने लांबविली आहे. भिवराजी मारोती गोत्राम (रा.बजाजनगर) यांनी ७ मार्चला सांयकाळी घरासमोर दुचाकी (एम.एच.२०,एफ.एल.७७२९) उभी केली होती. रात्रीच्यावेळी चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरुन नेली.
------------------------
घरमालकांची चिंता वाढली
वाळूज महानगर : कोरोनामुळे लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने किरायाने राहणारे कामगार मूळगावी जाण्याची शक्यता आहे. भाडेकरू घर खाली करुन गेल्यास आर्थिक नुकसान होणार असल्यामुळे घरमालकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. या परिसरात अनेकांनी कर्ज काढून बांधकाम केले. किरायाने रुम दिल्या आहेत. गतवर्षीही लॉकडाऊनमुळे अनेक कामगार मूळगावी निघून गेल्याने घरमालकांना मोठा अर्थिक फटका बसला होता. आता पुन्हा लॉकडाऊन लागला तर पुन्हा नुकसान होण्याची भीती घरमालकांतून वर्तविली जात आहे.
-----------------------