वाळूज महानगर : आठवडाभरापासून थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. रात्रीसह दिवसाही थंडी जाणवत असल्याने नागरिकांची पावले आपोआप उबदारक कपडे खरेदीकडे वळत आहेत. औरंगाबाद-नगर महमार्गावर परप्रांतीय विक्रेत्यांनी थाटलेल्या स्वेटर बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. उबदार कपड्याची मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
काही दिवसांपासून वाळूज महानगर परिसरात तापमान कमालीचे घसरले आहे. रात्रीसह दिवसाही गारवा अंगाला झोंबत असल्याने नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्याचा आधार घेत आहेत. रात्रीच्या वेळी नेहमी गर्दीने गजबजलेले मुख्य चौक व रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. औरंगाबाद-नगर महामार्गावरील कामगार चौक, तिरंगा चौकालगत परप्रांतीय विक्रेत्यांनी उबदार स्टॉल्स थाटले आहेत. स्वेटर, जॅकेट, कानटोपी, कानपट्टी या कपड्याला जास्तीची मागणी होत आहे. कांबळ, रग, ब्लॅकेट आदी कपड्याचीही खरेदी केली जात आहे. फन्सी जॅके टला तरुण वर्गातून अधिक मागणी होत आहे.
थंडीमुळे धंदा तेजीत ..महामार्गावर जवळपास ५० पेक्षा अधिक परप्रांतीय विक्रेत्यांनी दीड महिन्यापूर्वी उबदार कपड्याचे स्टॉल्स थाटले आहेत. १०-१२ दिवसांपासून कपडे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. अंतिम टप्प्यात का होईना खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढल्याचे कालूराम बंजारा, रोडमल राठौर, नाथूराम चौहान, राहुल सुरावत या विक्रेत्यांनी सांगितले.