औरंगाबाद : नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आणि औरंगाबाद जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली. तापमानात दररोज घसरण होत गेल्याने गेली. दोन आठवडे औरंगाबादकरांना चांगलीच हुडहुडी भरली; परंतु उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग मंदावल्याने गेल्या दोन दिवसांत किमान तापमान ६ अंशांनी वाढले. परिणामी, थंडी कमी झाली; परंतु पुढच्या आठवड्यापासून पुन्हा तापमानाचा पारा घसरून थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे.
औरंगाबादेत १ नोव्हेंबरपासून किमान तापमानात दररोज घट होत गेली. ११ नोव्हेंबर रोजी किमान तापमान १२.० अंश सेल्सिअस नोंदल्या गेले. यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले. त्यामुळे जिल्ह्यात थंडीत वाढ झाली. मात्र, अवघ्या दोन दिवसांत किमान तापमान शनिवारी (दि.१४)१९.२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. त्यामुळे थंडी कमी झाली. गेल्या वर्षी थंडी १५ नोव्हेंबरनंतर दिवसा व रात्री अशी सुरू झाली होती. यावर्षी १५ डिसेंबरनंतर दिवसा व रात्री थंडी तसेच धुके असेल, २० डिसेंबरपासून रॅपिड थंडी वाढणार असून, तापमान ५ अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरेल. यंदा मार्च महिन्यापर्यंत थंडीचा अनुभव येईल.
स्वेटरचा बाजार गरमहिवाळ्यामुळे सध्या उबदार कपड्यांची खरेदी करण्यास नागरिक प्राधान्य देत आहेत. शहरातील मिल काॅर्नर, पैठणगेट, जवाहर काॅलनी, टीव्ही सेंटर रोड आदी भागांतील बाजारपेठेत स्वेटर, जाकीट खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. दिवाळीसाठी नवीन कपडे खरेदी करतानाही अनेकांनी उबदार कपडे खरेदीला प्राधान्य दिल्याचे दिसले.
यंदा तापमान ५ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतेहवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे म्हणाले, उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग सध्या मंदावला आहे. त्यामुळे तापमानात वाढ झालेली आहे; परंतु पुढच्या आठवड्यात पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होणार आहे. गतवर्षी औरंगाबादचे तापमान ८ अंशांपर्यंत घसरले होते. यंदा पाऊस जास्त पडला आहे. त्यामुळे यंदा किमान तापमान ५ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.