औरंगाबाद : शहरात आठवडाभरानंतर पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढला आहे. चिकलठाणा वेधशाळेत गुरुवारी किमान १०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हिवाळा सुरू झाल्यापासून तापमानात सतत चढ-उतार होत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. अचानक थंडी वाढते आणि अवघ्या दोन ते तीन दिवसांत थंडी गायब होत असल्याचे पाहायला मिळते. शहरात गेल्या आठवड्यात गुरुवार, २० डिसेंबर रोजी तापमानाने यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी गाठली होती. सर्वात कमी तापमान ८.० अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले होते. त्यानंतर किमान तापमानात वाढ होत गेली. दोन दिवसांपूर्वी किमान तापमान १५ अंशांपर्यंत वाढले होते. त्यामुळे थंडीत घट झाली होती.
आठवडाभरानंतर पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे. शहरात बुधवारपासून चांगलीच थंडी जाणवायला सुरुवात झाली. त्यात गुरुवारी तापमानात आणखी घसरण झाली. चिकलठाणा वेधशाळेत कमाल तापमान २६.३ तर किमान १०.८ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. गार वाऱ्याने दुपारच्या वेळीही बोचरी थंडी जाणवत आहे. त्यामुळे दुपारच्या उन्हात उभे राहून ऊब मिळविताना नागरिक दिसून येत आहेत. थंडीमुळे सकाळी आणि सायंकाळी तर घराबाहेर निघणेही शहरवासीयांना अवघड होत आहे.
सुका मेवा खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दीवाढत्या थंडीमुळे लहान मुले आणि ज्येष्ठांची विशेष खबरदारी घेतली जात आहे. वाढत्या थंडीमुळे घरोघरी हिवाळ्यात पौष्टिक लाडू बनविण्याचीही लगबग सुरू आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांच्या विक्रीची दुकानेही सजली आहेत. याठिकाणी नागरिकांची खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे.