औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायत निवडणुकीत १६ हजार ९४२ उमेदवारांतून माघार घेणाऱ्यांची माहिती ऑनलाईन अपलोड करताना सोमवारी निवडणूक यंत्रणा नेटवर्कअभावी कोलमडली. ऐच्छिक चिन्हे मिळविण्यासाठी सुरू असलेली जोरदार रस्सीखेच आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला ४ जानेवारीला रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत मिळालेल्या मुदतीमुळे रात्री उशिरापर्यंत माघार किती जणांनी घेतली आणि रिंगणात उमेदवार किती, बिनविरोध ग्रामपंचायती किती आल्या हे चित्र स्पष्ट झाले नाही. उमेदवारांचा उच्चांकी आकडा आणि इंटरनेट नेटवर्कच्या खोळंब्याने निवडणूक यंत्रणेला घाम फोडला.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. माघार घेणाऱ्यांनी वेळेत अर्ज मागे घेतले; परंतु त्या अर्जाची माहिती ऑनलाईन अपलोड करण्यात इंटरनेट नेटवर्कमुळे अडचणी आल्या. तसेच उमदेवारांची संख्या जास्त असल्यामुळे सगळा गदारोळ उडाला. परिणामी तालुकानिहाय माघार घेणाऱ्या उमेदवारांचा आकडा वेळेत बाहेर आला नाही. औरंगाबाद तालुक्यात रात्री उशिरापर्यंत चिन्हे वाटपाचा घोळ सुरू होता. त्यातच लक्षवेधी असलेल्या पंढरपूर, तीसगांव ग्रामपंचायतीच्या पॅनेलची चिन्हांसाठी रस्सीखेच सुरू होती. पैठण, सोयगांव आणि खुलताबाद तालुक्यांत किती उमेदवार रिंगणात राहणार याची माहिती समोर आली होती. उर्वरित तालुक्यातील घोळ सुरूच होता.
जिल्ह्यातील लक्षवेधी ग्रामपंचायतीजिल्ह्यात लक्षवेधी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पैठण, वैजापूर, सिल्लोड आणि औरंगाबाद तालुक्यांत लक्षवेधी निवडणुका होणार आहेत. औरंगाबाद, पैठण तालुक्यांतील औद्योगिक वसाहतींच्या हद्दीतील ग्रामपंचायत निवडणुकींकडे सर्वांचे लक्ष आहे. तीसगांव, पंढरपूर सारख्या ग्रामपंचायती लक्षवेधी आहेत.
निवडणूक प्रक्रिया अधिकाऱ्यांची माहिती अशीनिवडणुक प्रक्रिया अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी सांगितले, अर्ज मागे घेणे आणि निवडणूक चिन्हे वाटप करण्याची ४ जानेवारी शेवटची तारीख होती. १७ हजारांच्या आसपास उमेदवार, त्यातून माघार घेणाऱ्यांची माहिती ऑनलाईन अपलोड करावी लागत होती. आयोगाने माघार घेण्यासाठी वेळ वाढवून दिलेला नव्हता. तहसीलदारांना अर्ज ऑनलाईन भरून देण्यासाठी वेळ वाढवून मिळाली.
या तालुक्यातील माहिती अशीखुलताबादमधील ७७ ग्रामपंचायतींसाठी ४७४ उमेदवार निवडणूक मैदानात असून, १५७ जणांना माघार घेतली.पैठण तालुक्यात ८० ग्रामपंचायतींसाठी १७७४ उमेदवार रिंगणात असून, ६८० जणांनी माघार घेतली.सोयगांव तालुक्यात ४० ग्रामपंचायतींसाठी ७५९ उमेदवार रिंगणात असून, १९३ जणांनी माघार घेतली.
या तालुक्यातील आकड्यांची रात्री उशिरापर्यंत जुळवाजुळवऔरंगाबादेतील ७७ ग्रामपंचायतींसाठी २ हजार १८१ पैकी किती उमेदवारांनी माघार घेतली हे रात्री उशिरापर्यंत जाहीर झाले नाही. गंगापूर ७१ ग्रामपंचायतींसाठी २ हजार २२६ उमेदवार, वैजापूर १०५ ग्रामपंचायतींसाठी २ हजार ६४९ उमेदवार, कन्नड ८३ ग्रामपंचायतींसाठी २ हजार ४३, सिल्लोड ८३ ग्रामपंचायतींसाठी २ हजार ३१९ उमेदवार, तर फुलंब्रीतील ५३ ग्रामपंचायतींसाठी १ हजार ४४८ उमेदवारांपैकी किती रिंगणात राहिले याची जुळवाजुळव करतांना यंत्रणेला घाम फुटला.