लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या प्राध्यापकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. मागील दोन वर्षांपासून रखडलेली पदोन्नतीची प्रक्रिया मागील पाच दिवसांत पूर्ण झाली आहे. यात चार जिल्ह्यांतील ३६८ प्राध्यापकांना पदोन्नती मिळाली असल्याची माहिती विद्यापीठाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांनी दिली.अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या नेमणुका, पदोन्नतीची प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनामार्फत करण्यात येते. महाविद्यालयातील प्राध्यापकांना ‘करिअर अॅडव्हान्समेंट स्किम’ (कॅश)अंतर्गत पदोन्नती देण्याची प्रक्रिया दोन वर्षांपासून राबविण्यात आलेली नव्हती. प्रत्येक वेळी कोणत्याही कारणावरून ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत होती; मात्र ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान, औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद येथे कॅम्प आयोजित करून पात्र प्राध्यापकांना पदोन्नती देण्यात आली आहे.यात औरंगाबाद शहर ५५, औरंगाबाद ग्रामीण ६६, जालना ७०, बीड १२९ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ४८ प्राध्यापकांचा समावेश आहे. पदोन्नती दिलेल्या सर्व प्राध्यापकांना आगामी दोन दिवसांत पदोन्नतीचे पत्र देऊन स्थानापन्नतेसाठीचे प्रस्ताव उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही डॉ. सरवदे यांनी सांगितले. या निर्णय प्रक्रियेमुळे बहुतांश प्राध्यापकांची पदोन्नती सहायकवरून सहयोगी प्राध्यापक अशी झाली आहे.विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयातील कॅश पूर्ण केले आहे; मात्र विद्यापीठातील विभागांमध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना मागील तीन वर्षांपासून पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. प्राध्यापकांच्या संघटनेने वारंवार याविषयी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना निवेदने दिली आहेत. मात्र तज्ज्ञ, उच्च शिक्षण विभाग आणि विद्यापीठ प्रशासनाच्या तारखा जुळत नसल्यामुळे या प्रक्रियेस विलंब झाला आहे. यामुळे विद्यापीठातील प्राध्यापकांनी ‘नॅक’च्या कामाकडेही दुर्लक्ष केलेले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने ५ ते ८ मार्चदरम्यान विद्यापीठातील ‘कॅश’ आयोजित केल्याची माहिती डॉ. वाल्मीक सरवदे यांनी दिली.
कॉलेजच्या प्राध्यापकांना ‘अच्छे दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:34 AM