वाळूज महानगर : बजाजनगरातील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्टोअररुमला शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनी अग्नीशामकदलाच्या जवानांना मदत केल्यामुळे आग इतरत्र पसरली नाही. या आगीच्या घटनेत स्टोअर रुमधील साहित्य भस्मसात झाले आहे.
या महाविद्यालयाच्या स्टोअर रुममधून दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास धूर निघत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या प्रकाराची माहिती प्राध्यापकांना दिली. प्राचार्य व प्राध्यापकांनी तात्काळ वाळूज अग्नीशामक विभागाला माहिती दिली. अग्नीशामकच्या जवानांसह प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करुन अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले.
यात स्टोअरमधील प्रयोगाचे साहित्य, मशनरी, टेबल, खुर्च्या आदी साहित्य भस्मसात झाले आहे. पूर्वी या स्टोअर रुमचा उपयोग वर्कशॉपसाठी करुन विद्यार्थ्यांचे प्रॅक्टीकल येथे घेतले जात होते. काही दिवसांपासून या वर्कशॉपचा वापर स्टोअररुमसाठी केला जात असल्याचे प्राचार्य उंदीरवाडे यांनी सांगितले. या महाविद्यालयाच्या स्टोअर रुमला आग नेमकी कशामुळे लागले हे स्पष्ट होऊ शकले नाही.