औरंगाबाद : दिवाळीच्या सुट्यांबाबत शालेय शिक्षण वर्तुळात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे, तर महाविद्यालयीन विद्यार्थी-प्राध्यापकांमध्ये केवळ दहाच दिवसांच्या सुट्या जाहीर केल्यामुळे नाराजीचा सूर उमटला आहे. दि. १ ते १० नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालय-विद्यापीठाला सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
तथापि, १ नोव्हेंबर रोजी विद्या परिषदेची बैठक असून, त्यात दिवाळी सुट्यांबाबत निर्णय अपेक्षित आहे. अनेक विद्यार्थी व प्राध्यापक संघटनांनी दिवाळीसारख्या सणासाठी दहा दिवसांची सुटी ही अत्यंत कमी आहे. सुट्या वाढवून द्याव्यात, अशी मागणी विद्यापीठ प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर सोमवारी विद्या परिषदेत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कोरोनामुळे विस्कळीत झालेले शैक्षणिक वेळापत्रक पूर्ववत करण्यासाठी यंदाची प्रथम सत्र परीक्षा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये घेण्याचे नियोजन आहे. यूजीसी व विद्यापीठाच्या नियोजनानुसार १ ऑक्टोबरपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून, ९० दिवसांत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या सूचना संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ विभागांना दिल्या आहेत. दुसरीकडे, अजूनही पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झालेली नाही. द्वितीय व तृतीय वर्षांसाठी अध्यापनाची प्रक्रिया मात्र १ ऑक्टोबरपासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे प्रथम वर्ष व वरच्या वर्गांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा समतोल साधण्यासाठी अध्यापकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळेच विद्यापीठाने यंदा दिवाळीसाठी अवघ्या दहा दिवसांच्या सुटीचे नियोजन केले आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
विद्या परिषदेचा अधिकारअभ्यासक्रम आणि सुट्यांच्या नियोजनाचे अधिकार हे विद्या परिषदेला असतात. विद्या परिषद हीच आता दिवाळी सुट्यांचा तिढा सोडवू शकते. १ नोव्हेंबर रोजी विद्या परिषदेची बैठक असून, त्यात या विषयावर चर्चा होईल, असे विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितले आहे.