छत्रपती संभाजीनगर : क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिल्यास संबंधित महाविद्यालये त्यास जबाबदार राहतील. पदवी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी मान्यताप्राप्त महाविद्यालये पाहूनच प्रवेश घ्यावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने केले आहे.
संलग्नित ४७१ महाविद्यालयांचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम व प्रवेश क्षमतांची यादी विद्यापीठाने ३१ मे रोजी प्रसिद्ध केली होती. पूर्णवेळ प्राचार्य, कुशल मनुष्यबळ व पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या महाविद्यालयांच्या कोर्सेसची प्रवेश क्षमता स्थगित करण्यात आली असून, काही कोर्सेसची क्षमता घटविण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. याशिवाय परंपरागत अभ्यासक्रमांच्या चार महाविद्यालयांचे प्रवेशही थांबविण्यात आले आहेत. संलग्नित ३३ व्यावसायिक महाविद्यालयांना प्रथम वर्ष प्रवेशासाठी अपात्र ठरविण्यात निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये चार जिल्ह्यांतील बीएड, बीपीएड व विधि शाखेतील महाविद्यालयांचा समावेश आहे.
शैक्षणिक वर्षात २०२३- २४ यासाठीची संलग्नित ४७१ महाविद्यालयांची यादी घोषित करण्यात आली. या यादीनुसार महाविद्यालयात एकूण १९०० पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सध्या सुरू असून, यापैकी ९७३ अभ्यासक्रमांनाच पूर्ण क्षमतेने प्रवेश देता येईल, तर यापैकी ३७२ महाविद्यालयांच्या ३९३ अभ्यासक्रमांचे प्रवेश पूर्णतः थांबविण्यात आले आहेत. ५३४ अभ्यासक्रमांचे प्रवेश घटविण्यात आले आहेत. संलग्नीकरण महाविद्यालये व त्यांचे अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता इत्यादी तपासून १५ जून २०२३ नंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात केली. प्रवेश घेण्याची अंतिम तारीख २० जुलै आहे. अतिरिक्त अभ्यासक्रमास किंवा मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिल्यास त्यास विद्यापीठ मान्यता देणार नाही.
...तर महाविद्यालयांवर कारवाईनवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त अभ्यासक्रम व प्रवेशक्षमतेची यादी प्रसिद्ध करण्यात आली. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले आहे.