औरंगाबाद : चोरलेली मोटारसायकल गाडीमालकाला ओळखता येऊ नये याकरिता चोरट्यांनी चक्क दुचाकीला रंगीत पट्ट्याचे स्टीकर लावले आणि मूळ नंबरप्लेट काढून मित्राच्या दुचाकीचा क्रमांक टाकला. एवढे करूनही आरोपी मात्र गुन्हे शाखेच्या नजरेतून सुटला नाही. पोलिसांनी त्याला चोरीच्या मोटारसायकलसह गुरुवारी अटक केली. दीपक डिगांबर सोनटक्के (२६, रा. राजनगर ) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीचा साथीदार सोनू मुंडेचा पोलीस शोध घेत आहेत.
गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, हवालदार शेख हबीब , विजय निकम, राजेंद्र साळुंके यांचे पथक १७ जून रोजी गस्तीवर होते. यावेळी उल्कानगरी परिसरातील एका शाळेसमोर उभ्या दुचाकीजवळ संशयित आरोपी उभा दिसला. या दुचाकीवर रंगीबेरंगी पट्टे पाहून पोलिसांनी त्याला त्याचे नाव आणि पत्ता विचारला. यानंतर पोलिसांनी त्याच्या मोटारसायकलची कागदपत्रे, लायसन्स विचारले. तेव्हा ही मोटारसायकल त्याचा मित्र सोनू मुंडेची असल्याचे त्याने सांगितले. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यानंतर त्याला गुन्हे शाखेत नेऊन त्याची सखोल चौकशी केली. तसेच दुचाकीच्या चेसिस क्रमांकावरुन दुचाकीचा मालक शोधला असता दुचाकीवरील क्रमांक बनावट असल्याचे दिसून आले. या मोटारसायकलचा खरा (एम एच २० सी एक्स ६२८४) असा असल्याचे तसेच ही दुचाकी जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गतवर्षी चोरीला गेल्याची नोंद असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी त्याला खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदार सोनूच्या मदतीने ही मोटारसायकल चोरल्याचे सांगितले. मित्राच्या मोटारसायकलचा क्रमांक त्याने या दुचाकीवर टाकला. पोलीस सोनू मुंडे याचा शोध घेत आहेत.