औरंगाबाद : संक्रांतीच्या दिवशी वाऱ्याचा वेग कमी असल्याने पतंग उडविणाऱ्यांचे कौशल्य पणाला लागले. अशा परिस्थितीतही अनेक पतंगबाजांनी आपला उत्साह टिकवून ठेवला होता. हजारो पतंग आकाशात उडताना दिसत होते. पतंगबाजीचा हा उत्साह जुन्या शहरात जास्त दिसून आला.
जुन्या शहरातील गच्ची-गच्चीवर आबालवृद्ध पतंग उडविताना दिसले. काही गच्चींवर डीजे लावण्यात आले होते. रीमिक्स गीतांच्या तालावर पतंग उडविले जात होते. प्रत्येकाचे लक्ष आकाशाकडे लागले होते. तहान, भूक विसरून अनेक जण पतंगबाजी करण्यात हरखून गेले होते. प्रतिस्पर्धीचा पतंग कटल्यावर ''काटे... काटे, आता कसे वाटते गोड गोड वाटते'' असे म्हणत जल्लोष केला जात होता. हे दृश्य गुलमंडी, औरंगपुरा, गोमटेश मार्केट, दिवाणदेवडी, खाराकुँआ, कुँवारफल्ली, धावणीमोहाला, राजाबाजार, शाहगंज, सराफा रोड, कासारी बाजार, बेगमपुरा, पदमपुरा, बन्सीलालनगर या भागात पाहण्यास मिळाले.
सकाळी सहा वाजेपासून पतंगबाजीला सुरुवात झाली होती. आज हवा कमी होती. यामुळे पतंग उडविणाऱ्यांचे सर्व कौशल्य पणाला लागले होते. लहान, थोर मंडळी पतंग उडवत होते व आनंद लुटत होते. यंदा सिडको, हडकोतही पतंग उडविणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले. काही तुरळक ठिकाणी डीजे लावून पतंग उडविताना तरुण व लहान मुले दिसून आली. शिवशंकर कॉलनीतही काही परिवार पतंग उडविण्याचा आनंद लुटताना दिसून आले. त्याठिकाणी विविध परिवारामधील मुली, सुना सर्वजण एकत्र पतंग उडवत होते. पहाटेपासून सुरू झालेली पतंगबाजी सायंकाळपर्यंत सुरू होती.
चौकट
शहरातील काही परिवार गुजरातमध्ये
शहरातील काही गुजराती परिवार संक्रांत साजरी करण्यासाठी दोन दिवस अगोदरच गुजरातमध्ये आपल्या नातेवाइकांकडे गेले आहेत. तिथेच खास पतंगबाजीचा आनंद ते लुटण्यासाठी गेले. कोण कोण गुजरातला गेले याची चर्चा शहरात सुरू होती.