लोकमत न्यूज नेटवर्ककन्नड : तालुक्यातील कुंजखेडा गावात पोलिसांनी गुरुवारी रात्री कोम्बिंग आॅपरेशन करुन ३६ दुचाकी ताब्यात घेतल्या.उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या ३६ मोटारसायकलींची पडताळणी करण्यात येत आहे.अजिंठा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीवरुन अजिंठा पोलीसांनी कन्नड तालुक्यातील गराडा व कुंजखेडा येथील प्रत्येकी एकजण ताब्यात घेतलेला आहे. या आरोपींनी चोरीच्या मोटारसायकली कुंजखेडा गावात विकल्याची माहिती दिली. त्याआधारे पोलिसांनी रात्री १२ ते शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कोम्बिंग आॅपरेशन केले. यात मोटारसायकलच्या कागदपत्रांची तपासणी करून मालकी सिध्द झालेल्या २० मोटारसायकली जागेवरच ताब्यात देण्यात आल्या. उर्वरीत ३६ मोटारसायकली शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या. या मोटारसायकलच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. कोणतेही वाहन खरेदी करताना कागदपत्रांची खात्री करा तसेच विक्री करणाऱ्या व्यक्तीची सुध्दा खात्री करावी. खरेदी करीत असलेले वाहन चोरीचे नाही याची खात्री करूनच वाहन खरेदी करावे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी सांगितले.
कुंजखेड्यात पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन
By admin | Published: July 08, 2017 12:33 AM