औरंगाबाद : ‘आओ अपना शहर बनायें’ही हॅशटॅग थीम ठेवून शहरात काम सुरू केले आहे. शहर बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. हे सर्व करीत असताना आर्थिक स्रोत मजबूत करणे, एक रुपयाही खर्च न करता अनेक विकासकामे करण्यात येणार आहेत. रस्ते, पाणी, पार्किंग, हॉकर्स झोन, घनकचरा, ऑक्सिजन हब आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्यात येईल, असे मत महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केले.
‘लोकमत’ कार्यालयास शुक्रवारी पाण्डेय यांनी सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या संपादकीय विभागातील सहकाऱ्यांसोबत त्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. बीडचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत असताना औरंगाबाद शहरात अनेकदा येत होतो. शहरातील परिस्थिती बघून मनाला वेदना होत असत. पत्नी मोक्षदा पाटील (पोलीस अधीक्षक) हिच्यासोबत या विषयांवर तासन्तास चर्चा होत असायची. तिनेच मला एक दिवस या सर्व बकाल स्वरुपाला आकार देण्यासाठी तुम्हीच पुढाकार घ्या असा सल्ला दिला. हा सल्ला चांगला वाटला. वरिष्ठांना विनंती केली. औरंगाबाद महापालिका आयुक्त म्हणून कोणीतरी येण्यास उत्सुक असल्याने तेसुद्धा खुश झाले. आयुक्त म्हणून पदभार घेण्यापूर्वी मी एक नागरिक म्हणून या शहरात वावरलो होतो. त्यामुळे शहरात सर्वसामान्य नागरिकाला कोणकोणत्या अडचणी येतात याची नोंद मी वेळोवेळी ठेवली. त्यानंतर २० वेगवेगळ्या मुद्यांवर आपल्याला शहरात काम करावयाचे असे ठरविले. त्याच अनुषंगाने कामाला सुरुवात केली आहे.
महापालिकेत येण्यापूर्वी तिजोरीत १४ लाख रुपये होते. सर्व परिस्थिती नकारात्मक होती. अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये कॉन्फीडन्सचा अभाव होता. महापौर नंदकुमार घोडेले स्वत: चांगले काम करीत आहेत. त्यांच्यासह राजकीय मंडळींनाही पुढील वाटचालीत सामावून घेतले. लोकसहभागावर माझा दांडगा विश्वास आहे. त्यादृष्टीने पाऊल उचलण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी यशही मिळाले.
थकबाकीचा डोंगर, उत्पन्नाचा अभावकंत्राटदारांची २८६ कोटींची बिले प्रलंबित होती. उत्पन्नाचा अभाव अशी मनपाची आर्थिक स्थिती होती. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वसुलीवर सर्वाधिक भर दिला. आतापर्यंत मालमत्ता करात १०० कोटी वसूल केले. पाणीपट्टीचे रेकॉर्ड मनपाकडे नव्हते. हे रेकॉर्ड मिळविले. आता पाणीपट्टीची वसुली २५ कोटींपर्यंत पोहोचली आहे.
३०० टन कचऱ्यावर दररोज प्रक्रियाचिकलठाणा येथे दररोज १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया सुरू आहे. पडेगाव येथील प्रकल्प महिन्या-दोन महिन्यात पूर्ण होणारच आहे. तेथेही १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. कांचनवाडीत ओल्या कचऱ्यापासून गॅसनिर्मिती करून हा गॅस शिवभोजनाला वापरण्याची योजना आहे. महापालिकेच्या मालकीच्या वजन काट्यावर लवकरच कचरा मोजला जाणार आहे.
प्रक्रिया केलेले पाणी शहरात आणणारकांचनवाडी येथे १५१ एमएलडी क्षमतेचा एसटीपी प्लँट आहे. दररोज दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. या पाण्याचा उपयोग लवकरच शहरासाठी करण्यात येणार आहे. बीड बायपास, कांचनवाडी आणि झाल्टा येथे पाणीपुरवठा केंदे्र तयार करण्यात येतील. नागरिकांना नाममात्र शुल्कात टँकर भरून नेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील एमआयडीसी, वाळूजला हे पाणी ६० टक्के देण्यात येईल. या उपक्रमात एमआयडीसी, महापालिकेला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. पण वापरण्यासाठी पाणी तर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कामासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही हिरवा कंदिल दाखविला आहे. शहरातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनाही हे पाणी वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाला दरमहा विजेचा खर्च ५५ ते ६० लाख रुपये येत असून, सौरऊर्जेचा वापर करून हा खर्च कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरातील वॉशिंग सेंटर चालकांनाही हेच पाणी वापरावे म्हणून सक्तीचे केले जाईल. जमिनीतील पाणी ही समाजाची संपत्ती आहे.
१०० कोटींच्या रस्त्यांचे सौंदर्यीकरण१०० कोटीत रस्त्यांची कामे झाल्यावर सौंदर्यीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत. ज्या कंत्राटदारांनी हे काम घेतले आहे, त्यांना सीएसआर फंडातून २ टक्केरक्कम खर्च करावी लागते. त्यांच्याकडूनच हे काम करून घेण्यात येणार असून, त्यांना मुदतवाढ हवी असेल तर हे करावेच लागेल. सौंदर्यीकरणात झाड लावणे, दुभाजक, फुटपाथ आदी कामे करावयाची आहेत.
घरी बसून कर भरामालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना यापुढे महापालिकेच्या कोणत्याच वॉर्ड कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित केला जाणार आहे. त्या माध्यमातून नागरिकांना घर बसल्या कर भरता येईल. महापालिकेचे ई-गव्हर्नन्सही दोन ते तीन महिन्यांत पूर्णपणे बदलण्यात येणार आहे. घर तिथे कर संकल्पना सुरूच आहे. घरांवर यापुढे मालमत्ता क्रमांक येईल. हा क्रमांक मालक बदलला तरी जशास तसा राहील.
नवीन पाणीपुरवठा योजनेत नळांना मीटर1680 कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी किमान ३ वर्षे लागतील. शहरात सध्या आणण्यात येणाऱ्या पाण्याची क्षमता वाढविण्यात येईल. काही पंप बदलले जाणार आहेत. उन्हाळ्यात पाणी प्रश्न गंभीर बनतो. त्यापूर्वी काही ठोस पावले उचलली जातील. नवीन पाणीपुरवठा योजनेत विजेचा खर्च प्रचंड येईल. मनपाला हे परवडणारे नाही. त्यासाठी सौरऊर्जेचा वापर कल्पकतेने करण्यात येणार आहे. या योजनेत नळांना मीटर बसविण्यात येणार आहे. जेवढ्या पाण्याचा वापर तेवढे बिल नागरिकांना येईल.
पाणीपट्टीचे दर कमी होणारदरवर्षी चार हजार रुपये पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे. पाणीपट्टीचे दर कमी करण्यासंदर्भात काम सुरू आहे. एप्रिलपासून नवीन दर लागू होतील. शहरातील बाजारपेठेत दिवसभर एका जागेवर बसून व्यवसाय करणाऱ्यांकडून किरकोळ स्वरुपात टॅक्स वसूल करण्यात येईल. शहरातील पार्किंग, हॉकर्स झोनवरही काही दिवसांमध्ये अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.