- फिरोज खानछत्रपती संभाजीनगर : पूर्वी उन्हाळाच्या सुट्या लागल्या की, गल्लीत चल रे दोस्ता, आरोळी ठोकताच बच्चेकंपनी सायकलवर टांग मारत घराबाहेर पडत. मात्र, मागील काही काळापासून आरोग्याविषयी जागृती निर्माण झाल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आता सायकलिंगच्या प्रेमात पडले आहेत. दीर्घायुषी राहण्यासाठी व्यायामाचा स्वस्त आणि मस्त पर्याय निवडणारे नागरिक आज जागतिक सायकल दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत.
१९९० च्या दशकात सायकल घरी असणे श्रीमंतीचे लक्षण होते. पुढे चारचाकीत आमूलाग्र बदल होत गेल्याने सायकलिंग कमी झाले. दरम्यान, सायकल व त्याच्या चालविण्याच्या फायद्यांविषयी जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने युनायटेड नेशन्स जनरल असेेम्ब्लीने सन २०१८ सालापासून ३ जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला गेला. शहर, खेड्यांत आजही विद्यार्थ्यांसह पोस्टमन, पेपर, दूध टाकणारे सायकलचा नियमित वापर करतात. तर काही हौशी खेळाडूंनी राज्य, देशभ्रमण सायकलवरून पूर्ण केलं आहे. नागरिकांनी सायकलिंगचे महत्त्व ओळखून शहरात सायकल क्लब देखील सुरू केले आहेत.
आरोग्य, पर्यावरण सुधारतेअभ्यासकांच्या मते दररोज किमान अर्धा तास सायकल चालविण्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. मेंदू आणि हृदयाचा रक्तपुरवठा चांगला होतो. लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह अशा आजारांपासून रक्षण होते. तसेच इंधन बचत होऊन पर्यावरणाचेही मोठ्या प्रमाणात रक्षण होते.
जिल्हा संघटनेकडून प्रोत्साहनकोरोनानतंर व्यायामाचे महत्त्व नागरिकांना समजले. सायकलिंग हा उत्तम व्यायाम आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल संघटना ही दर रविवारी सायकल राइड काढून लोकांना प्रोत्साहन देत असते.- चरणजितसिंग संघा, सचिव, जिल्हा सायकल संघटना
लाँग राइडसाठी सायकलीची निवडअनेक हौशी सायकलपटू लांब पल्याच्या राइडला जातात. तुळजापूर, शिर्डी, शिवनेरी, पंढरपूर अशी ठिकाणे निवडून देवदर्शन आणि पर्यटन दोन्ही साध्य करतात.- अतुल जोशी, सह-सचिव, जिल्हा सायकल संघटना