कन्नड : तालुक्याची अंतिम आणेवारी नक्कीच पन्नास टक्क्यांच्या आत राहील, असा विश्वास आ. उदयसिंग राजपूत यांनी व्यक्त केला. तर पीक आणेवारीच्या प्रक्रियेबाबत माहिती नसल्याने याकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
आ. राजपूत म्हणाले की, यावर्षी तालुक्यात जास्तीचा पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान झाले. वास्तविक सर्वच शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक होते. तालुक्याला मिळणारा मदतनिधी कमी असून सर्व शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे. पीक आणेवारी कशी जास्त लागली याबाबत पुराव्यासह माहिती मागितली आहे, यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. आणेवारी कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. पण त्यांचा काय संबंध आहे, असा सवाल उपस्थित करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपण राजकारण करीत नाही असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी तालुकाप्रमुख केतन काजे, डॉ. अण्णा शिंदे, अवचित वळवळे, शिवाजी थेटे, दिलीप मुठ्ठे, बंटी सुरे यांची उपस्थिती होती.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या प्रयत्नातून आणेवारीचा प्रश्न सुटल्याचे त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचार सुरु केल्याने आमदाराने पत्रकार परिषद घेतली. दुसरीकडे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खरे पण नुकसान झालेले पीकच शेतकऱ्यांनी काढून टाकले. मात्र, पीकपेऱ्याच्या नोंदीवरुन पंचनामे करण्यात येतील हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.