औरंगाबाद : सभेला जाण्याआधी राज ठाकरे यांनी आमच्यासोबत इफ्तार करण्यासाठी यावं. हिंदू-मुस्लीम एका ठिकाणी बसले तर एक चांगला संदेश जाईल, असे आवाहन एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी केल आहे.
राज ठाकरे यांच्या १ मे रोजीच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांनी आज पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची भेट घेतली. शहराच्या शांततेसाठी आम्ही काय करावे, आमची मदत कशी हवी, यासाठी आयुक्त गुप्ता यांची भेट घेतल्याचे यावेळी खा. जलील यांनी सांगितले. जलील पुढे म्हणाले, राज ठाकरे सभेसाठी शहरात येत आहेत. त्यांनी सभेला जाण्यापूर्वी आमच्यासोबत इफ्तारला याव. हिंदू-मुस्लीम एकाच ठिकाणी आल्यास चांगला संदेश जाईल. ९९ टक्के नागरिकांना शांतता हवी आहे. एक टक्के लोकांना गडबड व्हावी असे वाटते. त्यांना पायबंद घालण्यासाठी पोलीस सक्षम असल्याचा विश्वासही खा. जलील यांनी व्यक्त केला.
रमजान एक असा महिना असतो, ज्याचा प्रत्येक मुस्लीम वर्षभर वाट पाहत असतो. मागील दोन वर्षांत रमजान महिन्यात व्यापार झाला नाही. यात हिंदू मुस्लीम दोन्ही कडील व्यापारी आहेत. यासर्व व्यापाऱ्यांच्या मनात वातावरण बिघडेल अशी शंका व्यक्त होत आहे. सर्वांनी माल भरून ठेवला आहे. ९९ टक्के लोक शांतता प्रिय असतात. उरलेले १ टक्के लोकांना ताब्यात ठेवण्याचे काम पोलिसांचे आहे. आम्ही पोलीस विभाग आणि नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी आलो आहोत. हे शहर सर्वांचे आहे. त्यांच्या मनातील भिती दुर व्हावी यासाठी आयुक्तांची भेट घेतल्याचे खा. जलील यांनी स्पष्ट केले.