औरंगाबाद : विषारी औषधचे सेवन करून २३ वर्षीय लॅब असिस्टंटने आत्महत्या केल्याची घटना हिमायतबाग परिसरात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. तरुणावर अनेकांचे कर्ज होते सोमवारी त्याने सर्वांना कॉल करून तुमचे पैशे उद्या देतो असे सांगितले होते. रेहान खान जाबाज खान, (२३,रा.टाइम्स कॉलनी, औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास हिमायतबाग मध्ये मॉर्निंगवॉक साठी काही नागरिक जात असताना त्यांना एका झाडाखाली एक तरुण मृतावस्थेत पडलेला दिसला असता नागरिकांनी पोलिसांना कळविले. बेगमपुरा पोलिसांच्या एका पथकाने तातडीने धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली असता तरुणाजवळ एक विषारी कीटकनाशकाची रिकामी बाटली व एक धारदार कटर आढळून आला. तसेच पोलिसांना रेहानची दुचाकी हिमायत बाग च्या प्रवेशद्वारा जवळ मिळाली. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात हलविले. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रेहानवर अनेकांचे होते कर्ज.रेहान हा एका खाजगी पॅथॉलॉजी लॅब मध्ये असिस्टंट म्हणून कामाला होता. त्यावर अनेकांचे कर्ज होते. कर्जाची रक्कम सुमारे ५० लाखांवर गेली होती. अनेकजण पैशासाठी त्याकडे तगादा लावत होते. त्याने कालच (सोमवारी) सर्वाना फोन करून, माझं पैस्यांचे काम झालेलं आहे. उद्या सकाळी तुमचे पैसे देतो असे सांगितले होते.
घरी सांगितले रोशनगेटला जातो सोमवारी दुपारी रोशनगेट ला जाऊन येतो, पैशाचे काम आहे, असे सांगून घराबाहेर पडला होता मात्र तो रात्रभर घरी आलाच नाही.आज सकाळी त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली अशी माहिती रेहानच्या मोठ्या भावाने दिली.