औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले आणि मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा उभारणारे विनोद पाटील यांना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेनेत येण्याची ‘ऑफर’ दिली.
जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे हे शहरात होते. सकाळी त्यांनी पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे आणि पाटील यांच्यात चर्चेचा सेतू बांधला. ठाकरे आणि पाटील यांच्यामध्ये १० ते १५ मिनिटे चर्चा झाली. सुरुवातीला सर्वांनी मिळून चहा घेतला. नंतर शिंदे आणि इतर नेत्यांना ठाकरे यांनी बाहेर धाडले ठाकरे आणि पाटील यांच्यातच चर्चा झाली. या चर्चेत ठाकरे यांनी पाटील यांना किती दिवस बाहेर राहता, आता आमच्यासोबत या, अशी साद घातली. पाटील यांनी त्यांना ताबडतोबीने काहीही प्रतिसाद दिला नाही.
पालकमंत्री शिंदे यांनी पाटील यांना औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेशासाठी साकडे घातले होते. परंतु पाटील यांनी नकार दिला होता. मराठा कार्ड म्हणून शिवसेना विनोद पाटील यांच्या दारी जात आहे. परंतु पाटील यांनी अजून तरी होकार दिलेला नाही. आदित्य ठाकरे यांनी त्यांना प्रवेशाबाबत विचारणा केल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पाटील, ठाकरे चर्चेत काय तरुणांसाठी काम करायचे असेल, तर असे बाहेर राहून किती दिवस चालेल, आमच्यासोबत या, एकत्रित काम करू, असे आवाहन ठाकरे यांनी केले. शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील युवकांसाठी ठाकरे काम करीत आहेत. मोफत शिक्षण, आरोग्य, केंद्रीय विद्यापीठ हे मुद्दे घेऊन ठाकरे कार्य करीत आहेत. युवकांसाठी भविष्यात सोबत येऊन काम करता येईल यावर पाटील आणि ठाकरे यांच्यात चर्चा झाली. या भेटीबाबत पाटील यांनी खूप बोलणे टाळले. तसेच शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा सुरू आहे, यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. सदिच्छा भेटीप्रमाणे आमच्यात चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले.
काय दिली ऑफर सेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद पाटील यांना शिवसेनेचे उपनेतेपद किंवा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद मध्य मतदारसंघातून उमेदवारी किंवा आगामी काळात विधान परिषदेवर निवडून देण्याबाबत शिवसेना तयार आहे. पाटील यांनी याबाबत अद्याप कोणताही होकार दिला नसल्याची माहिती आहे.