- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : ‘साथ मेरे आओगी... आईस्क्रीम खाओगी...’ हे १९८३ मधील ‘जस्टिस चौधरी’ चित्रपटातील गाणे लोकप्रिय बनले होते. त्याची आठवण सध्या बाजारपेठेत फिरल्यावर येत आहे. कारण, वाढत्या तापमानाबरोबर थंडगार आईस्क्रीमने उलाढालीत यंदा विक्रम मोडला आहे. मागील ३ महिन्यांत औरंगाबादकरांनी ४० कोटींच्या आईस्क्रीमचा आस्वाद घेतला आहे.
आईस्क्रीम वर्षभर मिळते; पण उन्हाळ्यात आईस्क्रीमचा आस्वाद घेण्याची मज्जा काही औरच असते. मागील दोन वर्षे कोरोनाकाळात शहरवासीयांना आईस्क्रीम खाता आले नाही. त्यामुळे यंदा विविध फ्लेव्हरच्या आईस्क्रीमचा मनसोक्त स्वाद घेतला जात आहे. दुकानात तर आईस्क्रीम खाल्ले जात आहेच; शिवाय फॅमिली पॅकही खरेदी केले जात आहेत. लग्न असो वा मुंज; स्वरुची भोजनानंतर हमखास कुल्फी, आईस्क्रीमचा बेत असतोच. सध्या बाजारात ‘फालुदा’ची मोठी विक्री होत आहे. त्यातही ‘आईस्क्रीम फालुदा’ सुपरहिट ठरत आहे.
१८० प्रकारचे फ्लेव्हरआईस्क्रीममध्ये १० ते १५ प्रकारचे फ्लेव्हर आपणास माहीत आहेत, पण आजघडीला १८० पेक्षा अधिक फ्लेव्हर उपलब्ध आहेत. त्यात यंदा केशर क्रीम बॉल, क्रीम एन कुकीज, मसालेदार पेरू व्हाईट चॉकलेट, मसाला पान, ड्रायफ्रूट मलाई, सीताफळ, शहाळे नारळ आईस्क्रीम, अमेरिकन नट्स इ. नावीन्यपूर्ण स्वादामध्ये उपलब्ध आहेत. तसेच कोन व कुल्फी या प्रकाराला जास्त मागणी आहे. ५ रुपयांच्या कुल्फीपासून ते ९०० रुपयांच्या क्रीम बॉलपर्यंत आईस्क्रीम मिळत आहे.
मेपर्यंत ६५ कोटींची उलाढाल !दरवर्षी औरंगाबादेत आर्थिक वर्षात ७० कोटींची उलाढाल आईस्क्रीम उद्योगात होत असते. त्यातील ४५ कोटींची उलाढाल फेब्रुवारी ते मे महिना या हंगामात होत असते. यंदा ४० कोटींची उलाढाल तीन महिन्यांतच पूर्ण झाली. मे महिन्यात आणखी २५ कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. म्हणजे ६५ कोटी चार महिन्यांतच, तर वर्षभरात १०० कोटीपर्यंतची उलाढाल अपेक्षित आहे. यंदाचा उन्हाळी हंगाम आईस्क्रीम उद्योगासाठी चांगला राहिला.- अनिल पाटोदी, अध्यक्ष, आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन