औरंगाबाद : कमी प्रवासी संख्येमुळे आदिलाबाद - मुंबई सीएसएमटी नंदीग्राम विशेष एक्स्प्रेस तात्पुरती रद्द करण्यात आली होती. ही रेल्वे १ जुलैपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे उपलब्ध होणार आहे.
नंदीग्राम एक्स्प्रेस कधी सुरू होणार, यासंदर्भात ‘लोकमत’ने २७ जून रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. अखेर ही रेल्वे पुन्हा एकदा रुळावर येणार आहे. मुंबई सी. एस. एम. टी. ते आदिलाबाद नंदिग्राम विशेष एक्स्प्रेस मुंबई सी. एस. एम. टी. येथून १ जुलैपासून धावणार आहे. तर, आदिलाबाद ते मुंबई सी. एस. एम. टी. नंदीग्राम विशेष एक्स्प्रेस २ जुलैपासून धावणार आहे. रेल्वेच्या वेळा आणि थांबे पूर्वीप्रमाणेच असतील. यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. रेल्वे पूर्णतः आरक्षित असणार आहे. प्रवास करताना केंद्र आणि राज्य शासनाने दिलेले कोविड प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करणे प्रवाशांना बंधनकारक असेल, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.