औरंगाबाद : लॉकडाऊननंतर आता येथील ऑटोमोबाईल उद्योगाने चांगली गती घेतली आहे. दिवाळी- दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बजाज ऑटोचे चांगले शेड्यूल आले असून, अवलंबित उद्योगांकडे ऑर्डरचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे.
यासंदर्भात ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत यांनी सांगितले की, लॉकडाऊननंतर येथील उद्योग आता बऱ्यापैकी सावरले आहेत. हळूहळू उत्पादन क्षमता वाढत आहे. यंदा पाऊस चांगला झाला असल्यामुळे शेतीचे उत्पादन चांगले येईल. शेतकऱ्यांच्या हातात पैसे येतील. लवकरच विस्कटलेली आर्थिक घडी लवकरच पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा आहे. सध्या ऑटोमोबाईल उद्योगाने चांगली गती घेतली आहे. मात्र, लहान व मध्यम उद्योगांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यांना बँकांनी आधार दिला पाहिजे. सध्या ऑर्डरची चिंता मिटली असली, तरी लॉकडाऊनमुळे हलाखीची परिस्थिती झालेल्या या उद्योगांना उभारी घेण्यासाठी बँका सहकार्य करतील, अशी अपेक्षा धूत यांनी व्यक्त केली. एकीकडे, उत्पादन क्षमता वाढत आहे, तर दुसरीकडे उद्योगांना कुशल मनुष्यबळाची काही प्रमाणात उणीव भासू लागली आहे. यापुढे ती जास्त भासेल. सध्या ६० ते ७० टक्क्यांपर्यंत ऑर्डरचे प्रमाण आहे.
उद्योजकांवर लॉकडाऊनची टांगती तलवार‘सीएमआयए’चे सचिव सतीश लोणीकर म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कधी आटोक्यात येईल, हे सांगता येत नाही. अलीकडे जिल्ह्यात दिवसेंदिवस बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन पुन्हा एकदा लॉकडाऊनचा निर्णय घेते की काय, अशी भीती उद्योजकांमध्ये आहे. औरंगाबादचे उद्योग हळूहळू गती घेत आहेत. लहान-मोठ्या उद्योगांकडे पुढील दोन महिन्यांचे शेड्यूल चांगले आहे.