औरंगाबाद : एकीकडे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी लागू केली आहे, तर मुख्य बाजारपेठ लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी त्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील जुन्या कांद्याला दिल्ली, आंध्र प्रदेश व ओडिशा राज्यातून मागणी सुरू झाली आहे. यामुळे मंगळवारी जाधववाडीत कांदा किलोमागे ३ रुपयांनी महागला.
देशात कांद्याचे वाढते दर लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर अचानक बंदी घातली. या निर्णयाचा त्वरित परिणाम स्थानिक बाजारावर दिसून येईल, असे सांगितले जात होते. मात्र, जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी चक्क १०० किलोमागे ३०० रुपयांनी भाव वाढले. रविवारी २०० ते २२०० रुपये प्रति १०० किलो विक्री होणार कांदा मंगळवारी २०० ते २५०० रुपयांना विकला जात होता. जिल्ह्यात जुना कांदा शिल्लक आहे. दिल्लीत हा कांदा ३५ ते ४० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे.
येथील लासलगाव भागात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने जाधववाडीतून दिल्ली, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यात ५ ट्रक कांदा रवाना झाला. १६ टन कांदा प्रत्येक ट्रकमध्ये भरला जातो. यासंदर्भात कांद्याचे होलसेल व्यापारी इसाखान यांनी सांगितले की, परराज्यात जाणारा कांदा ८ ते ९ महिने जुना आहे. येथून २५०० रुपये १०० किलोमागे आम्हाला भाव मिळतो. तिथे ३५ ते ४० रुपये किलोने कांदा विकला जातो. नवीन कांदा येण्यास अजून एक ते दीड महिना बाकी आहे. निर्यातबंदीमुळे लासलगाव आदी ठकाणी कांद्याचे भाव घसरले; पण जाधववाडीत भाव वधारले.
मंडईत १० ते ३० रुपये किलोने कांदा विक्रीभाजीमंडईमध्ये कांदा ३० रुपये किलोने विकला जात आहे, तर खराब कांदा १० रुपयांनी विकत आहे. हॉटेल, भजेविक्रेते, खानावळ, पाणीपुरी, भेळपुरीवाले १५ रुपये किलोपर्यंत कांदा खरेदी करतात, असे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले.