औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे आलेली मरगळ झटकून औरंगाबादच्या पाचही औद्योगिक वसाहतींतील बहुतांश उद्योगांनी ८० टक्के, तर काहींनी त्यापेक्षा जास्त उत्पादन क्षमतेकडे झेप घेतली आहे.
कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी २४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनमुळे औरंगाबादसह देशभरातील उद्योग, बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. राज्य सरकारने ‘अनलॉक’ घोषित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने साधारणपणे जूनपासून औरंगाबादच्या उद्योगांची यंत्रे फिरू लागली. बंद असलेल्या देश-विदेशातील बाजारपेठा, कुशल मनुष्यबळाचा अभाव, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, ऑर्डरचे घटलेले प्रमाण या साऱ्या बाबींमुळे जुलै-ऑगस्टपर्यंत उद्योगांसमोर अनेक प्रश्न निर्माण केले. प्रयत्न करूनही ५०-५५ टक्क्यांपुढे उत्पादन क्षमता जात नव्हती.
अलीकडे, हळूहळू बाजारपेठा सुरू होत असून उत्पादनांना चांगली मागणी आहे. दुसरीकडे दसरा-दिवाळीसारखे सण तोंडावर आले असल्यामुळे उद्योग क्षेत्राने कात टाकली आणि आता बहुतांश उद्योगांची उत्पादन क्षमता जवळपास ८० टक्के, तर ऑटोमोबॉईल, फार्मास्युटीकल, अन्नप्रकिया, बीअर आदी उद्योगांची १०० टक्क्यांपर्यंत उत्पादन क्षमता पोहोचली आहे. मोठ्या उद्योगांवर अवलंबून असलेल्या लघु व सूक्ष्म उद्योगांकडेही डिसेंबरअखेरपर्यंत ऑर्डर आहेत. असे असले, तरी अजून आंतरराज्य रेल्वेवाहतूक सुरू झालेली नसल्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये गावी गेलेले फक्त २० टक्के परप्रांतीय कामगार परत येऊ शकले आहेत. त्यामुळे उद्योगांसमोर सध्या तरी कुशल कामगारांची टंचाई आहे. तूर्तास स्थानिक कामगारांना प्रशिक्षित करून त्यांच्या आधारे उद्योगांचा कारभार सुरू असल्याचे उद्योगांचे म्हणणे आहे.
अनिश्चिततेचे सावट दूर होताना दिसतेययासंदर्भात ‘सीएमआयए’चे सचिव सतीश लोणीकर यांनी सांगितले की, गेल्या चार महिन्यांपासून उद्योगांवर अनिश्चिततेचे सावट होते. उद्योग जरी हळूहळू सुरू झाले असले, तरी देशांतर्गत बाजारपेठा उघडलेल्या नव्हत्या. दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत चाललेले होते. शासन-प्रशासन आणि उद्योगांनी त्यासंदर्भात प्रभावी उपाययोजना आखल्या. कोरोनाची भीती आता बऱ्यापैकी कमी झाली. कामगार कामावर यायला लागले. आता नवीन वर्षापर्यंत बहुतांश सर्व उद्योगांकडे ऑर्डर असून आता उत्पादन क्षमताही ८० टक्के व त्यापुढे पोहोचली आहे. परिणामी, आता उद्योगांवरील अनिश्चिततेचे सावट दूर होताना दिसत आहे.