औरंगाबाद : ज्या औद्योगिक ग्राहकांचा वीज वापर मार्च महिन्यातील वापराच्या तुलनेत २५ टक्के कमी असेल व मार्च महिन्यातील पॉवर फॅक्टर ०.९ च्यावर असेल, अशा ग्राहकांना पुढील बिलात सवलत मिळणार आहे. मार्चमधील पॉवर फॅक्टरच्या आधारावर वीज बिल दुरुस्त करण्याचे आदेश विद्युत नियामक आयोगाने दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने ३० मार्च २०२० रोजी बहुवर्षीय वीज दर लागू करण्याबाबतचे आदेश काढले होते व हे नवीन दर १ एप्रिलपासून लागू करण्यात आले होते. या बहुवर्षीय वीज दरानुसार उच्चदाब वीज ग्राहकांना केडब्ल्यूएच (किलोवॅट पर अवर) ऐवजी केव्हीए एच (किलोवॅट ॲम्पस रिॲक्टिव्ह अवर्स) आधारित वीज बिल आकारणी करण्यात येणार आहे. या बदलानुसार उच्चदाब ग्राहकांना आपला पॉवर फॅक्टर हा एक ठेवल्यास त्यांना ‘केडब्ल्यूएच’च्या वापराएवढे बिल आकारण्यात येते; पण ग्राहकाचा पॉवर फॅक्टर कमी जास्त झाल्यास वाढीव वीज बिल आकारण्यात येते.
लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवसाय, उद्योग व बाजारपेठा बंद होत्या. यामुळे लॉकडाऊनच्या काळात पॉवर फॅक्टर नियंत्रणात न राखता आल्यामुळे अनेक वीज ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यासंदर्भात चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरने (सीएमआयए) ८ जून २०२० रोजी वीज नियामक आयोगाकडे औद्योगिक ग्राहकांतर्फे याचिका दाखल केली होती. लॉकडाऊनच्या काळात उच्चदाब वीज ग्राहकांना ‘केडब्ल्यूएच’वर आधारितच बिल द्यावे व लघुदाब ग्राहकांना पॉवर फॅक्टरवरील दंड रद्द करण्याची विनंती या याचिकेमध्ये करण्यात आली होती.
वीज नियामक आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सुनावणीत सीएमआयएतर्फे हेमंत कापडिया यांनी बाजू मांडली. या याचिकेवर वीज नियामक आयोगाने १३ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निर्णयामुळे औद्योगिक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. त्यानुसार या निर्णयामुळे औद्योगिक ग्राहकांसाठी लॉकडाऊन काळातील वीज बिल कमी होणार आहे, असे सीएमआयचे मानद सचिव सतीश लोणीकर यांनी सांगितले.